महिला पोलीस आधिकार्‍यांचा ‘एसडीएमपी योगाथॉन’ मध्ये सहभाग
स्थानिक बातम्या

महिला पोलीस आधिकार्‍यांचा ‘एसडीएमपी योगाथॉन’ मध्ये सहभाग

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

सूर्यनमस्कारातून सर्वांगीण आरोग्याचा संदेश देणार्‍या ‘एसडीएमपी योगाथॉन-२०२० ‘मध्ये महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकारीदेखील सहभागी होणार आहेत. या अभिनव उपक्रमाच्या टी-शर्ट्सचे शनिवारी (दि.२५ ) एमपीएच्या संचालिका अश्वती दोरजे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी (दि.२८) रोजी सहभागी महिला व मुलींना या टी-शर्ट्सचे वितरण केले जाणार आहे.

अनावरण कार्यक्रमाप्रसंगी एसडीएमपी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पगार, उपक्रमाच्या आयोजिका डॉ. स्वाती पगार, डॉ. मनीष हिरे, डॉ. राहुल चौधरी, धनश्री धारणकर उपस्थित होते. शहरातील डी. एम. पगार हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी (एसडीएमपी) संस्थेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी मुली व महिलांसाठी १०८ सूर्यनमस्कारांची मेगा मॅरेथॉन अर्थात योगाथॉन आयोजित करण्यात आले आहे.

गंगापूररोडवरील सुयोजित विरिडियन व्हॅलीत पहाटे साडेसहा वाजता या अनोख्या उपक्रमाला सुरूवात होणार आहे. त्यात महिलांसह १२ वर्षांवरील मुलींना सहभागी होता येईल. मिसेस ग्लोबल युनायटेड डॉ. नमिता कोहोक उपक्रमाच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असून, त्याच्या शुभारंभाप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. उपक्रम यशस्वितेसाठी विविध भागांतील सर्व योगशिक्षक, योगसाधक, योग संस्था, आरोग्यासाठी कार्यरत संस्था प्रयत्नशील आहेत. गेल्यावर्षी या उपक्रमात ७५० नाशिककर सहभागी झाले होते. यंदा या उपक्रमात तब्बल दीड हजारांहून अधिक महिला व मुलींचा प्रतिसाद लाभल्याचे डॉ. पगार यांनी सांगितले.

मंगळवारी सहभागींना टी-शर्ट्सचे वितरण
योगाथॉनसाठी नावनोंदणी केलेल्या महिला व मुलींना मंगळवारी (दि.२८) टी-शर्ट्सचे वितरण केले जाणार आहे. प्रौढ नागरिक मित्र मंडळ, डिसुझा कॉलनी, मॉडेल कॉलनी चौक, कॉलेजरोड येथे सकाळी ८.३० ते सायंकाळी ७.३० या वेळात सहभागींनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com