राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ उपक्रम; शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्णय
स्थानिक बातम्या

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ उपक्रम; शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्णय

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

आवश्यक प्रमाणात पाणी न प्यायल्याने शालेय विद्यार्थ्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याने यावर उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

शाळेत शिक्षण घेणार्‍या मुलांच्या शरीरात जाणवणारी पाण्याची कमतरता अनेक आजारांचे कारण आहे. शरीराच्या आवश्यकतेनुसार पाणी न प्यायल्याने मुलांना आजारांचा धोका उद्भवू शकतो. वय, उंची आणि वजनाच्या प्रमाणानुसार मुलांनी दिवसाकाठी किमान दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक ठरते.

मात्र, बर्‍याचदा घरून भरून नेलेली पाण्याची बाटली मुले तशीच घरी आणतात, अशी तक्रार पालकांची असते. पाणी कमी प्यायल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होणे ( डिहायड्रेशन), थकवा येणे, मूत्रमार्गात संसर्ग होणे, मूतखडा (किडनी स्टोन) होणे, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते. शाळेतील मुले अभ्यासाच्या आणि खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरून जातात. तेव्हा पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी घंटा वाजवण्याचा उपक्रम (वॉटर बेल)अंतर्गत शाळेच्या वेळापत्रकात तीनवेळा घंटा वाजवण्याबाबत मुख्याध्यापकांनी वेळ निश्चित करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

पाणी पिण्याच्या या राखीव वेळेत मुलांनी आवश्यकतेनुसार पाणी प्यायल्यामुळे त्यांची पाणी पिण्याविषयी मानसिकता तयार होईल व पुढे सवय होईल, असे शासन आदेशात म्हटले आहे. यावेळेत मुलांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभा द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com