‘वॉचमन’ ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता ‘सुलतान’
स्थानिक बातम्या

‘वॉचमन’ ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता ‘सुलतान’

Abhay Puntambekar

आठवीत असतानाच कुटूंबाची जबाबदारी, ध्येय ऑलिंपिक्सचे

नाशिक । दिनेश सोनवणे

वयवर्ष अवघे १४ असताना घरची जबाबदारी अंगावर आली. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिंकण्याची जिद्द यामूळे प्रसंगी पार्टटाईम काम केले पण खेळण्याची आवड सोडली नाही. कथा आहे निफाड तालुक्यातील आहेरगांव येथील सुलतान देशमुख या कॅनॉइंग खेळाडूची. काल  जाहीर झालेल्या राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कारामध्ये सुलतानचा समावेश आहे. सुलतानला राष्ट्रकुल स्पर्धा खेळायच्या आहेत त्यानंतर पुढे ऑलिम्पिकमध्येही देशासाठी खेळायचे आहे.

२०१४ साली सुलतानने खर्‍या अर्थाने खेळायला सुरुवात केली. तेव्हा सुलतान अवघ्या नऊ वर्षांचा होता. खेळातील सातत्य त्यानी कायम ठेवले. पिंपळगांव बोट क्लब येथे सुलतानने सराव सुरु केला. दिवसा सराव करायचा आणि रात्रीला वॉचमनची नोकरी केली. जवळपास पाच वर्षे ही नोकरी त्याने केली. अवघ्या पाच हजार पगारात त्याने शिक्षणही केले आणि घरगाडाही हाकला.

पिंपळगाव महाविद्यालयात त्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर सुलतानला क्रीडा शिक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानी वेळोवेळी मार्गदर्शन करत सुलतानला मजल दरमजल करत अनेक स्पर्धांना उतरण्यासाठी प्रवृत्त केले. सुलताननेही उत्तम खेळ करत नावलौकीक मिळवला.११ वी पासून तृतीय वर्षात शिक्षण घेत असताना सुलतानने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये जवळपास १४ पेक्षा अधिक सुवर्णपदकांनी कमाई सुलतानने केली होती. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीमध्ये खेळताना जवळपास १२ वेगवेगळ्या पदकांची कमाई सुलतानने केली. यामध्ये पाच सुवर्ण, रौप्य तीन आणि कांस्य चार अशा पदकांची कमाई केली.

पाच राष्ट्रीय स्पर्धा सुलतान खेळला यामध्येही सुलतानने चांगला खेळ केला. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत सुलतान सहाव्या क्रमांकावर राहिला होता. २०१९ मध्ये वरीष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. एकुण पाच स्पर्धा सुलतान खेळला यामध्ये चौथ्या स्पर्धेत पहिल्यांदाच महाराष्ट्राला 28 वर्षांत कांस्यपदक सुलतानने मिळवून दिले.

सुलतानला २०१८ मध्ये ‘महाराष्ट्र कॅनोइंग बेस्ट प्लेयर’, २०१९ मध्ये पुणे विद्यापीठाचा ‘खाशाबा जाधव’ पुरस्कार, मराठा विद्या प्रसारक समाजाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार व चालु वर्षी नाशिक जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार मिळाला आहे. नाशिकमधील डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टस्मेड रिहाब सेंटरमध्ये डॉ. मुस्तफा टोपीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली सुलतानने धडे घेतले. महाराष्ट्र पोलीसचे विकास वाळुंज यानी सुलतानला वेळोवेळी मदत करत प्रतिकुल परिस्थितीत वडीलकीचा हातभार लावत मदत केल्याचे सुलतान सांगतो.

कष्टाचे फळ मिळाले
सुलतान प्रचंड जिद्दी आहे, कष्ट करण्याची त्याची प्रचंड तयारी आहे. पिंपळगावला असताना सरावासाठी सुलतानने कधीच वेळ मारुन नेली नाही. वेळेवर पोहोचून नियमित सराव त्याने केला. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामूळे एका कंपनीत वॉचमनची नोकरी केली. कुटूंब, नोकरी शिक्षण सांभाळून सुलतानने अनेक स्पर्धेमध्ये यश मिळवले. आज राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून त्याच्या कष्टाचे खर्‍या अर्थाने फळ त्याचा मिळाले आहे.
हेमंत पाटील सुलतानचे प्रशिक्षक

Deshdoot
www.deshdoot.com