व्हीव्हीपॅटच्या १२ लाख चिठ्ठ्या केल्या नष्ट
स्थानिक बातम्या

व्हीव्हीपॅटच्या १२ लाख चिठ्ठ्या केल्या नष्ट

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आयोगाने व्हीव्हीपॅट ही सुविधा उपलब्ध दिली होती. निवडणूक निकालाला आठ महिने पूर्ण झाले असून व्हीव्ही पॅटमधील १२ लाख चिठ्ठ्या नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अंबडच्या अन्न महामंडळाच्या गोदामात अधिकार्‍यांच्या देखरेखीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील व्हीव्ही पॅटमधील मतदान चिठ्ठ्या यंत्राच्या आधारे नष्ट करण्यात आल्या आहेत.

देशभरात ईव्हीएमद्वारे मतदानावर शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान यंत्राला व्हीव्ही पॅट जोडण्यात आले होते. या यंत्रामुळे मतदाराला आपण कोणाला मतदान केले, याची माहिती छापील चिठ्ठीवर पाहण्यास मिळाली. नाशिक लोकसभा मतदारसंघात ११ लाख २२ हजार ९२ जणांनी मतदान केले होते. त्यातील ८६० मत काही कारणास्तव अवैध ठरली. या शिवाय मतदान प्रक्रिया सुरू करताना रंगीत तालीमवेळी यंत्राचा वापर झाला. या प्रक्रियेत व्हीव्ही पॅटमध्ये प्रत्येक मतदानाच्या चिठ्ठ्या जमा झाल्या.

अंबडच्या अन्न महामंडळाच्या गोदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर झाले. निवडणूक आयोगाने मध्यंतरी व्हीव्ही पॅटमधील चिठ्ठ्या नष्ट करण्याची सूचना केली होती. प्लास्टिकचे पातळ आवरण असणार्‍या चिठ्ठ्या नष्ट करण्यासाठी यंत्राचा वापर केला जात आहे. त्याकरिता तीन फेजच्या वीज जोडणीची गरज होती. अंबडच्या गोदामात ती नसल्याने चिठ्ठ्या नष्ट करण्याचे काम रखडले होते.निवडणूक शाखेने या जोडणीसाठी महावितरणकडे पाठपुरावा केला. त्या क्षमतेची जोडणी मिळाल्यानंतर बुधवारी हे काम सुरू करण्यात आले. निवडणूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या देखरेखीत १५ कामगारांच्या मदतीने व्हीव्ही पॅटमधून चिठ्ठ्या काढण्याचे काम सुरू झाले. जवळपास १२ लाख चिठ्ठा यंत्राद्वारे नष्ट करण्यात आल्या.

Deshdoot
www.deshdoot.com