एसटीकडून प्रवासी सुरक्षा वार्‍यावर; व्हीटीएसचे नियंत्रंण कक्षच नाही
स्थानिक बातम्या

एसटीकडून प्रवासी सुरक्षा वार्‍यावर; व्हीटीएसचे नियंत्रंण कक्षच नाही

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

सर्वसामान्यांना भयमुक्त प्रवास करता यावा व महिलांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी सार्वजनिक वाहनांमध्ये वाहनशोध प्रणाली (व्हीटीएस) व पॅनिक बटण कार्यान्वित करण्यात आले. मात्र, या यंत्रणेचे नियंत्रण व देखरेख करणारे कक्षच अस्तित्वात नसल्याची बाब उघड झाली आहे.

केंद्र सरकारची ही योजना असल्याने याचे श्रेय केंद्राला अर्थात भाजप सरकारला जाईल. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार आहे. यामुळे या योजनेची अमंलबजावणी झाली. मात्र, त्याच्या नियंत्रणकक्षाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. पण, श्रेयवादामुळेच नियंत्रणकक्षाची अंमलबजावणी रखडली असल्याची चर्चा रंगत आहे. नियंत्रणकक्ष उभारणीसाठी जागांची पाहणी पूर्ण करण्यात आली आहे.

कक्षाच्या अपेक्षित खर्चासह प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. परिवहन विभागाच्या अधिकृत माहितीनुसार, राज्यात एकूण ३५,१०० वाहनांमध्ये व्हीटीएस आणि पॅनिक बटण कार्यान्वित करण्यात आले आहे. ९१०० बस तर मालवाहतूक करणार्‍या सुमारे ३००० गाड्यांमध्ये व्हीटीएस कार्यान्वित करण्यात आले आहे. निर्भया प्रकरणानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणार्‍या गाड्यांमध्ये व्हीटीएस, सीसीटीव्ही आणि पॅनिक बटण अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारना घेतला. २०१५-१६ मध्ये हा निर्णय घेण्यात आला. याची अधिसूचना ऑक्टोबर २०१८ मध्ये काढण्यात आली. मात्र, राज्यात याच्या अमंलबजावणीसाठी ‘तारीख पे तारीख’ पडत आहे.

राज्यातील ३५ हजारांहून अधिक वाहनांमध्ये ही यंत्रणा सुरू आहे. नियंत्रण कक्ष उभारणीनंतर या वाहनचालकांना पुन्हा नव्याने ही यंत्रणा बसविण्याची गरज निर्माण होण्याची भीती अधिकार्‍यांकडून व्यक्त होत आहे. यामुळे सध्या ही यंत्रणा कार्यान्वित केलेल्या वाहनचालकांना पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

व्हीटीएस म्हणजे ?
वाहन शोध प्रणाली (व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम अर्थात व्हीटीएस) आपत्कालीन परिस्थितीत अथवा अडचणीच्या वेळी गाडीचा ठाव-ठिकाणा कळण्यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली. बेदरकार वाहन चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे यामुळे होणार्‍या अपघातांना या यंत्रणेमुळे आळा घालणे शक्य होईल. जीपीएसच्या मदतीने ही यंत्रणा काम करते.

पॅनिक बटण म्हणजे?
प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये प्रवाशांना बिकट प्रसंगी सुरक्षायंत्रणांकडून मदत मिळावी, यासाठी पॅनिक बटण ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. या बटणाची जोडणी नियंत्रण कक्षाकडे असते. प्रवाशांनी बटण दाबताच नियंत्रण कक्षासह जवळच्या पोलिस ठाण्यात याची सूचना मिळते.

Deshdoot
www.deshdoot.com