मतदार पडताळणी मोहिमेला २९ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
स्थानिक बातम्या

मतदार पडताळणी मोहिमेला २९ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

Abhay Puntambekar

४३ लाख ५३ हजार मतदारांची पडताळणी

नाशिक । प्रतिनिधी

निवडणूक आयोगाकडून मतदार पडताळणी मोहिमेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. २९ फेबु्रवारी ही नवीन डेडलाईन आहे. जिल्ह्यात ९५ टक्के मतदार पडताळणी पूर्ण झाल्याचा दावा निवडणूक शाखेने केला आहे. जवळपास ४३लाख ५३ हजार मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

निवडणूक आयोगाने देशभरात राष्ट्रीय मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला आहे.आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार पडताळणी मोहीम राबविण्यात येते आहे. मागील वर्षीच्या ११ नोव्हेंबरपासून या मोहिमेला प्रारंभ झाला. त्यानुसार बूथ लेवल ऑफिसर यांनी घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी, दुबार व मयत नावे वगळणे, पत्ता दुरुस्ती, नवमतदारांची नोंदणी करायची होती.

२० डिेसेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करायची होती. जिल्ह्यातील १५ मतदारसंघ मिळून ४५ लाख ६२ हजार इतके मतदार आहेत. मात्र, दिलेल्या मुदतीत अवघे ८९ हजार मतदारांची पडताळणी होऊ शकली होती. त्यामुळे या मोहिमेला १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार १४ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९५.४१ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकाही विधानसभा मतदार संघामध्ये १०० टक्के पडताळणी पूर्ण होऊ शकलेली नाही. ४५ लाख ६२ हजार ४४२ मतदारांपैकी ४३ लाख ५३ हजार ८१ मतदारांची पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

मतदारसंघनिहाय पडताळणी (टक्के)
नाशिक मध्य- ९९.०३
चांदवड- ९८.५३
निफाड- ९८.४२
दिंडोरी- ९७.०२
नाशिक पूर्व- ९३.२३
मालेगाव बाह्य- ९५.२४
नांदगाव- ९५.८७
कळवण- ९५.४७
इगतपुरी- ९५.४४
सिन्नर- ९४.७८
देवळाली- ९४.६५
येवला- ९३.९९
बागलाण- ९३.२७
मालेगाव मध्य- ९२.४५
नाशिक पश्चिम- ९१.३५

Deshdoot
www.deshdoot.com