१६ लाख ४ हजार मतदारांची पडताळणी पूर्ण
स्थानिक बातम्या

१६ लाख ४ हजार मतदारांची पडताळणी पूर्ण

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्ह्यात मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असला तरी अतिशय कासव गतीने ही मोहीम सुरु आहे. मागील एक महिन्यात ४५ लाख मतदारांपैकी शुक्रवारपर्यंत (दि.१७) १६ लाख ४ हजार मतदारांची पडताळणी पूर्ण झाली. अद्याप २८ लाख मतदारांची पडताळणी होणे शिल्लक आहे.

पडताळणी मोहिमेबाबत बीएलओंमध्ये निरुत्साह असल्याचे पहायला मिळत आहे. अनेक तालुक्यांमध्ये बीएलओंकडून कामात टाळाटाळ केली जात होती. अखेर निवडणूक शाखेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर पडताळणी कामाला काहीशी गती प्राप्त झाली आहे. कामात दिरंगाई केल्यास निवडणूक शाखेने थेट संबंधित बीएलओंवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले होते. त्यानंतर मतदार पडताळणी मोहिमेने वेग घेतला आहे.

मात्र कळवण आणि निफाड तालुक्यामधील बीएलओंकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने जिल्ह्यातील पहिली कारवाई यापैकी एका तालुक्यातून होऊ शकते, अशी शक्यता निवडणूक यंत्रणेकडून वर्तविली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला आहे.

जिल्ह्यात २० डिसेंबर २०१९ पर्यंत ४५ लाख मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र बीएलओ गांभीर्याने काम करीत नसल्याने केवळ ८९ हजार मतदारांची पडताळणी करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून २० फेबु्रवारीपर्यंत पडताळणी मोहीमेला मुदतवाढ देण्यात आली. मागील एक महिन्यात १६ लाख मतदारांची त्यांच्या घरी जाऊन पडताळणी पूर्ण झाली आहे. जे कर्मचारी गांभीर्याने कर्तव्य बजवणार नाहीत अशा बीएलओंवर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक विभागाने दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com