बालकांना लसीकरण महत्त्वाचेच : मांढरे;     ४ लाख ३८ हजार बालकांना दिला पोलिओ डोस
स्थानिक बातम्या

बालकांना लसीकरण महत्त्वाचेच : मांढरे; ४ लाख ३८ हजार बालकांना दिला पोलिओ डोस

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

मातेने आपल्या बाळाला पोलिओची लस देवून आजारापासून सुरक्षित करावे. मुलांना दागिने घालण्यापेक्षा नियोजित वेळेत आजारांच्या प्रतिबंधक लसी देवून सुरक्षित करणे गरजेचे आहे. मला एकच मुलगी असून तिला बालपणापासून योग्यवेळी आवश्यक त्या लसी दिल्याने तिचे आरोग्य निरोगी ठेवण्यात यश आल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारी (दि.१९) जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे व विभागाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजून करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत नाशिक शहर व जिल्ह्यातील ४ लाख ५४ हजार २०१ मुलांना पोलिओ लस दिली जाणार आहे.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गुंजाळ, डॉ. अनंत पवार, डॉ. विठ्ठल काळे, डॉ. राम पाटील आदी उपस्थित होते. ० ते ५ वयोगटातील मुलामुलींना पोलिओची लस मोफत दिली जाते. लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागामार्फत ग्रामीण, शहरी भागामध्ये विविध ठिकाणी बुथ तयार करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ३ हजार ५३७ बुथवर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संयुक्त नियोजनाने आरोग्य कर्मचार्‍यांकडून लसीकरण सुरू आहेे. जिल्ह्यात ९ हजार १८२ कर्मचारी बुथवर सेवा देत आहेत. रेल्वे स्टेशन, बसस्थानक येथे ३२५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून यांच्यामार्फत पोलिओ लसीकरण केले जात आहे. लसीकरण मोहिमेसाठी पर्यवेक्षक म्हणून ८०९ सुपरवायझर व २७७ वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरवर्षी १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम राबविण्यात येते. लाखो बालकांना पोलिओ आजारापासून वाचविण्यात यश प्राप्त केले आहे. आठ वर्षांमध्ये भारतात एकही पोलिओचा रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात रविवारी राबविलेल्या या मोहिमेत ४ लाख ५७ हजार ८४० बालकांपैकी ४ लाख ३८ हजार १८१ बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. त्यामुळे जिल्ह्याचे ९५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. यात पाच वर्षावरील ३ हजार ४३ तर पाच वर्षांच्या आतील ४ लाख ३५ हजार १३८ बालकांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com