आरोग्य केंद्र इमारत दुरुस्तीसाठी निकृष्ट पत्र्यांचा वापर
स्थानिक बातम्या

आरोग्य केंद्र इमारत दुरुस्तीसाठी निकृष्ट पत्र्यांचा वापर

Abhay Puntambekar

खामखेडा । वार्ताहर

येथील आनंदीबाई जोशी पुरस्कार व आयएसओ मानांकनप्राप्त आरोग्य केंद्र इमारतीच्या छताला पत्रे बसवण्याचे काम सुरू असून हलक्या दर्जाचे लोखंडी पत्रे वापरण्यात येत असल्याची निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी काम बंद पाडले.

राज्याचे माजी आरोग्यमंत्री कै. डॉ. दौलतराव आहेर यांच्या प्रयत्नाने खामखेडा परिसरातील ग्रामीण जनतेला आरोग्यसेवेचा लाभ मिळावा यासाठी खामखेडा उपकेंद्रातच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आरोग्य केंद्राची नूतन इमारत उभारण्यात आली व छताला सिमेंटचे पत्रे बसवण्यात आले होते. त्या पत्र्यांचे आयुर्मान संपल्याने व पत्रे फुटल्याने पावसाळ्यात संपूर्ण इमारत गळकी झाली होती.

जिल्हा परिषदेच्या विशेष निधीतून सदर इमारतीचे पत्रे बदलण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले होते. परंतु हलक्या दर्जाच्या पत्र्यांचा वापर करण्यात येत असल्याचे उपसरपंच संजय मोरे, माजी सरपंच अण्णा पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र शेवाळे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी काम बंद पाडले. उच्च व चांगल्या दर्जाचा नामांकित कंपनीचा कोटिंग पत्रा वापरण्यात येत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने आतापर्यंत डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम व द्वितीय पुरस्कार, कायाकल्प पुरस्कार तसेच नाशिक जिल्ह्यातील ९००१-२००८ आयएसओ मानांकन मिळविले आहे. या दवाखान्यात नियमित कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात येतात. अनेक वर्षांपासून कुटुंबकल्याण शस्रक्रियांची उद्दिष्टपूर्ती करण्यात खामखेडा आरोग्य केंद्र तालुक्यात अग्रेसर राहिले आहे. खासगी दवाखान्यांना लाजवेल, अशा सुविधा व आदर्श कामकाजामुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आदर्श आरोग्यवर्धीनी केंद्र म्हणून खामखेडा आरोग्य केंद्राकडे पाहिले जाते.

आरोग्य केंद्राच्या इमारतीचे पत्रे फुटल्याने पावसाळ्यात संपूर्ण इमारतीला गळती लागली होती. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर इमारतीच्या डागडुजीला निधी उपलब्ध झाला. त्यातून छताला पत्रे बसविण्याचे कामही सुरू झाले होते. परंतु हलक्या दर्जाचे लोखंडी पत्रे वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने काम बंद पाडले.
संजय मोरे ,उपसरपंच, खामखेडा

Deshdoot
www.deshdoot.com