अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी- खा.डॉ.भारती पवार
स्थानिक बातम्या

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी- खा.डॉ.भारती पवार

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यात अवकाळी गारपीटीसह वादळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी केली आहे.

उमराळे (ता.दिंडोरी) येथे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची खा.डॉ.भारती पवार यांच्याकडून दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार कैलास पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, कृषी अधिकारी विजय पवार यांचे समवेत पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना शेता पिकांचे तत्काळ पंचनामे करून मेटाकुटीला आलेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

दिंडोरी तालुक्यातील अस्वलीपाडा, अहिवंतवाडी, चामदरी, पवारणीचा पाडा, कोल्हेर, पिंपरी अंचला, चौसाळे, पांडाणे, माळे दुमाला, अंबानेर, पुणेगाव, सारसाळे आदी भागात जोरदार पावसाने वादळी वाऱ्यासह गरिपीटमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असल्याने अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.

तासभर चाललेल्या वादळी अतिवृष्टीत गारपीट देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याने कांदा, गहू, बाजरी तसेच द्राक्ष पिकांना गारांचा मार लागल्याने, या उभ्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असताना काढून ठेवलेला कांदा झाकतांना शेतकऱ्यांची पूर्ती धावपळ उडाली होती. पांडाणे, पुणेगाव, अंबानेर, चौसाळे, व पिंगळवाडी परिसरात पावसासोबत गारा पडल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे.

अगोदरच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असताना शेतकऱ्यांच्या शेत मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्यात अवकाळी वादळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून तत्काळ पंचनामे करून सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन आधार द्यावा ,अशी मागणी खासदार डॉ.भारती पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com