नाशकात आढळला कोरोना संशयित रुग्ण; उपचारार्थ सिव्हिलमध्ये दाखल
स्थानिक बातम्या

नाशकात आढळला कोरोना संशयित रुग्ण; उपचारार्थ सिव्हिलमध्ये दाखल

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

जगभरात कोरोनाचे थैमान पसरत असून परदेशातून नाशिकला आलेल्या एका व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोरोना विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधीतास सर्दी झाल्याने त्यांना खबरदारी म्हणून दाखल करण्यात आले असून रविवारी (दि.१) त्यांचा वैद्यकीय अहवाल मिळणार आहे.

कोरोना ससंर्गजन्य आजार असून त्यावर खबरदारी घेणे हाच उपाय आहे. त्यामुळे कोरोेनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावरच तपासणी केली जात आहे. बुधवारी (दि.२६) देखील इटली देशातून एक नागरिक मुंबई विमानतळावर उतरला. त्याची विमानतळावर चाचणी करण्यात आली त्यात आक्षेपार्ह लक्षणे नसल्याने त्यास सोडण्यात आले. त्यानंतर ती व्यक्ती गुरुवारी (दि.२७) नाशिकला आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांची गुरुवारी व शुक्रवारी वैद्यकीय तपासणी केली.

दरम्यान, शनिवारी (दि.२९) संबंधीत व्यक्तीस सर्दी झाल्याने त्यांना खबरदारी म्हणून तातडीने जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्या घशाचा स्त्राव घेण्यात आला असून तो पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. त्याचा वैद्यकीय अहवाल रविवारी मिळणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ॲलर्जी मुळे सर्दी झाली आहे, मात्र खबरदारी म्हणून त्यांना दाखल करण्यात आले आहे.

संबंधीत रुग्णास  खबरदारी म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल रविवारी प्राप्त होणार आहे. याआधीही पाच रुग्णांची तपासणी करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरु नये, खबरदारी म्हणून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Deshdoot
www.deshdoot.com