राज्य पोलीस स्पर्धा रंगणार नाशकात
स्थानिक बातम्या

राज्य पोलीस स्पर्धा रंगणार नाशकात

Abhay Puntambekar

१९ मार्चपासून प्रारंभ, ६ हजार खेळाडूंचा सहभाग

नाशिक । प्रतिनिधी

यावर्षी होणार्‍या महाराष्ट्र राज्य पोलीस अजिंक्यपद स्पधार्ं आयोजनाचा मान नाशिकला मिळाला असून १९ ते २५ मार्च दरम्यान या स्पर्धा होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

नाशिक परिक्षेत्र, नाशिक आयुक्तालय, नाशिक ग्रामीण पोलीस व राज्य पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या संयुक्तपणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रेत्येक परिक्षेत्रस्तरीय स्पर्धा पार पडल्या आहेत. या स्पर्धेतील विजेते संघ तसेच खेळाडू हे राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. हे सर्व अव्वल खेळाडू या स्पर्धेत एकमेकांना भिडणार आहेत. स्पर्धेसाठी राज्यभरातून ६ हजार पेक्षा अधिक खेळाडू व अधिकारी नाशिक येथे येणार आहेत.

स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असून बहुतांंश मैदानी स्पर्धा या राज्य पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीच्या मैदांनावर होणार आहेत. यासाठी प्रबोधिनीत कोट्यवधी रूपये खर्चून विविध १४ मैदाने तयार करण्यात येत आहेत. तर जलतरण स्पर्धा नाशिकरोड येथील जिजामाता तरणतलाव या ठिकाणी होणार आहेत.

स्पर्धेच्या तयारीसाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नियोजन बैठका सुरू असून हा सोहळा अधिक भव्यदिव्य व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धांच्या उद्घाटनासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, उपसंचालक, सहसंचालक तसेच इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या प्रसंगी सिने अभिनेता अक्षयकुमार व इतर अभिनेते उपस्थित राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com