अपघात रोखण्याची जबाबदारी सर्वांची:  कळसकर
स्थानिक बातम्या

अपघात रोखण्याची जबाबदारी सर्वांची: कळसकर

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने अपघात रोखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने वाहतूक सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून सुरक्षिततेची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे अवाहन परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांनी येथे केले.रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालकांना हेल्मेट वाटप , युनिफॉर्म वाटप करण्यात आले. शहरातील एकूण ४५ सिग्नलवर वाहतूक नियमांचे प्रत्येकी चार फलक लावण्यात आले असून या फलकाचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले
कळसकर म्हणाले की, अपघातांच्या प्रमाणात होत असलेली वाढ हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी पर्यंत करत असते मात्र केवळ प्रशासन नव्हे तर रस्त्यावर चालणार्‍या सर्व वाहनचालक नागरिक यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. तसेच अपघात ग्रस्ताला लवकरात लवकर मदत उपलब्ध होऊन अपघातात जखमी होणार्‍यांना लवकरात लवकर कशा सुविधा मिळतील आणि त्यातून मृत्यू पावणार्‍यांची संख्या कशी कमी होईल याची काळजी सर्वानीच घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आ. देवयानी फरांदे यांनी वाहतूक सुरक्षितते बाबत नाशिक ट्रान्सपोर्ट कडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करून अपघात रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. तेव्हाच यावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनीं नाशिक ट्रान्सपोर्ट कडून राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, विनय कुमार, मोहन पवार, कैलास चावला यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, विनय अहिरे, निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, महिंद्रा लॉजिस्टिकचे नीरज भामरे, मोहन पवार, दिलीप सिंग बेनिवाल, कैलास चावला, अरविंद इनामदार, सुभाष पवार, नाशिक ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा यांच्यासह नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com