तेजस पुरस्कार मुलाखत : निसर्गसंवर्धनासाठी जंगलात जावे असे नाही-वैभव भोगले
स्थानिक बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : निसर्गसंवर्धनासाठी जंगलात जावे असे नाही-वैभव भोगले

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

हार्पेटॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण,
निसर्गसंवर्धन आणि पर्यावरणाविषयी जनजागृतीचे उपक्रम,
समाजमाध्यमांचा यासाठी सुयोग्य वापर.

मी मूळचा कोकणातील सिंधुदुर्गचा.तिथे मुळातच जैवविविधता आहे. आमच्या घराच्या शेजारी घनदाट जंगल होते. त्यात अनेक पक्षी, प्राणी, साप आढळायचे. त्यामुळे तिथे फारसे कोणी जायचे नाही. पण आम्ही मुले तिथे खेळायला जायचो. आजूबाजूच्या भागात राहणारे लोक तेथील साप मारायचे. एकदा मला खेळताना साप दिसला, पण लोकांनी त्याला मारू नये म्हणून मी त्याला पकडले आणि जंगलात सोडून दिले. तिथून माझी ह्या क्षेत्राची सुरुवात झाली.

हळूहळू लोकांना समजल्यानंतर साप पकडण्यासाठी लोकं मला घरी बोलवायला लागले. त्यानंतर मला ह्या क्षेत्राबद्दल समजले. सर्पमित्र काय असते ते कळले. नंतर माझ्या वडिलांची नाशिकला बदली झाली, त्यामुळे आम्ही सर्व कुटुंब नाशिकमध्ये स्थायिक झालो. आदर्श माध्यमिक विद्यालयात मी शिकलो. महाविद्यालयात गेल्यानंतर मी कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतलेला. पण मी त्यात रमलो नाही.

मग माझ्या मित्राच्या सल्ल्याने मी पुण्याला हार्पोटोलॉजिस्टचा (यात उभयचर प्राण्यांचा अभ्यास केला जातो.) कोर्स पूर्ण केला. तिथे जाऊन मला जाणवले की, आपण या क्षेत्रात करिअर करू शकतो. तो अभ्यास पूर्ण झाल्यावर पुन्हा नाशिकला आलो आणि आत्ता मी बीएससी झूलॉजीच्या दुसर्‍या वर्षाला शिकत आहे.

सुरुवातीलादेखील या क्षेत्रात आव्हाने होती आणि आजही आहेत. ज्यावेळी या क्षेत्राची घरच्यांना माहिती नव्हती तेव्हा त्यांचा हे काम करण्यासाठी खूप विरोध होता. पण ज्यावेळी त्यांना समजले की मी नक्की काय काम करतोय, माझे लेख वर्तमानपत्रात यायला लागले तेव्हा मात्र त्यांना माझा अभिमान वाटला आणि त्यांनी मला पाठिंबा दिला.

लोकांना पूर्ण माहिती नसते त्या आधीच ते आपल्याविषयी मत बनवतात आणि आपल्याला नावे ठेऊन मोकळे होतात. या क्षेत्रात काम करताना जाणवते की, अजूनही लोक अंधश्रद्धेला कवटाळून बसले आहेत. कुठेतरी त्यांनी चौकटीबाहेर येऊन विचार करण्याची गरज आहे. लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आम्ही विविध व्याख्याने आयोजित करतो.

गावांमध्ये, शाळांमध्ये पर्यावरण, प्राणीसंवर्धन अशा विविध विषयांवर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन देतो आणि प्राणी, पक्षी यांचे निसर्गातील महत्त्व पटवून देतो. आपण प्राण्यांचा अधिवास नष्ट करत आहोत, त्यामुळे ते शहरी वस्तीत येत आहेत. आपण त्यांना त्यांचा आदिवास कसा मिळवून देऊ शकतो, याबद्दल आम्ही जनजागृती करतो.

या प्रवासातील अनुभव चांगले पण आणि वाईटही आहेत. शेवटी तो प्राणी आहे. कितीही दक्षता घेतली तरीही धोका असतोच. प्राण्यांच्या मुक्ततासंदर्भातील चांगला अनुभव इंदिरानगरचा सांगेन. एका बंगल्यात साप होता आणि तिथेच त्यांच्या पाळीव कुत्र्याने 4 पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील 2 पिल्लांना त्या सापाने जखमी केले होते तर 2 पिल्लांचा चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. पिल्लांना वाचवण्यासाठी त्या कुत्रीनेही सापाला जखमी केले होते. आमचे काम असे होते सापालाही पकडायचे आणि त्या 2 पिल्लांसहित कुत्रीलाही वाचवायचे. अशा परिस्थितीत आम्ही आधी सापाला पकडले, मग कुत्रीला पकडून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आणि त्या पिल्लांनादेखील वाचवले.

हे काम मी २४ तास न थकता करतो. पण या व्यतिरिक्त मला वाद्यांची आवड आहे. मी बासरी वाजवतो. आत्ता सध्या मी 3 वर्षांपासून शिवाज्ञा ढोल पथकात ताशा वाजवतो. वेळ मिळेल तेव्हा मी आवर्जून वाचन करतो.

आताची पिढी डिजिटल आहे. पण समाजमाध्यमांचा त्यांनी योग्य वापर करावा. निसर्गाची हानी होणार नाही, यासाठी त्यांनी या माध्यमांचा वापर करायला हवा. शेवटी निसर्गरक्षणाची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे.

आपण आपल्या गाडीचा वेग नियंत्रणात ठेवला तर अनेक प्राण्यांचे जीव वाचतील. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी जंगलातच गेले पाहिजे असे नाही. आपण आपल्या घराच्या आजूबाजूचा निसर्ग वाढवला तरीही आपण त्याला खूप मोठा हातभार लावू शकू.

Deshdoot
www.deshdoot.com