Friday, April 26, 2024
Homeनाशिकतेजस पुरस्कार मुलाखत : गुरुंची आज्ञा पाळा, यशस्वी व्हा! – सुजित काळे

तेजस पुरस्कार मुलाखत : गुरुंची आज्ञा पाळा, यशस्वी व्हा! – सुजित काळे

नाशिक | प्रतिनिधी 

वयाच्या सहाव्या वर्षांपासून तबलावादनाला सुरुवात,
तबला वादनाच्या पाचही प्रकारात हातखंडा,
अनेक पुरस्कारांनी सन्मानित,
परदेशातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण.

- Advertisement -

मी एक व्यावसायिक तबला वादक आहे. तबला वादनाची ओढ लहानपणापासून कळत-नकळत निर्माण झाली. दसककर घराणे हे माझे आजोळ, त्यामुळे तबल्याचे व गाण्यांचे बोल सतत कानावर पडायचे. त्यामुळे संगीताचे संस्कार माझ्यावर होत गेले. माझे आजोबा प्रभाकर दसककर हे भजनाचे क्लासेस घ्यायचे.त्याला माझे मामा संजय दसककर हे तबला साथ करायचे. त्यांच्यामुळे माझ्या भावाला व मला तबल्याची आवड निर्माण झाली.

माझं शालेय शिक्षण पेठे हायस्कूलमध्ये झाले. शाळेत असताना गॅदरिंगमध्ये तबला वादनाची संधी मिळाली ती तांबट सरांमुळे. मी वयाच्या सहाव्या वर्षांपासून पंडित भानुदास पवार, (जे आता या जगात नाहीत.) यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र नितीन पवार सरांकडे तबला वादन शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ते शिक्षण आजपर्यंत चालू आहे. पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे २००५ सालापासून तबल्याचे पुढील शिक्षण घेत आहे. अकरावी-बारावीला मी सायन्स घेतले होते. परंतु मी कलेची आवड लक्षात आल्यावर बारावीनंतर आर्टस्ला प्रवेश घेतला. तबला विषय घेऊनच बी. ए. आणि एम. ए. केले.

नाशिकमध्ये १९६९ साली पंडित नाना मुळे भीमसेन जोशींना तबला साथ-संगत करण्यासाठी नाशिकला आले होते. त्यांनी आमचे गुरू भानुदास पवार यांना तबल्याचे क्लासेस सुरू करा, असे सांगितले. त्याकाळी नाशिकमध्ये तबला शिकवणारे गुरू नव्हते. तेव्हा भानुदास पवार, कमलाकर वारे आणि विजय हिंगणे हे तीनही दिग्गज मुळे सरांकडे तबला शिकायचे. पण पवार सरांनी क्लासेस सुरू कले आणि तेव्हापासून नाशिकमध्ये तबल्याची परंपरा सुरू झाली. हा ५० वर्षांपूर्वीचा काळ होता.

मी पुढे जाऊन एम. ए. तबल्यात सुवर्णपदक मिळवले. हा अभ्यास निरंतर चालणारा आहे. तबल्याचे शिक्षण घेताना प्रामुख्याने जाणवते की तबला वाजवण्याचे प्रशिक्षण वेगळे आणि तबल्याची थिअरी अर्थात शिक्षण वेगळे. याचाच समन्वय साधणारा उत्तम तबला वादक होते. अर्थात हे सगळे शिक्षण आणि सादरीकरण ही अखंड प्रक्रिया आहे.वयाच्या विसाव्या वर्षांपासून मी व्यावसायिक तबलावादनाला सुरुवात केली. सध्या मी के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे मी तबला वादनाचे धडे देतो.

आताच्या पिढीकडे बघताना जाणवते की, आमची पिढी गुरुजी शिकवतील ते एकाग्र चित्ताने शिकायचो. परंतु आत्ताच्या पिढीला चौफेर माहिती मिळत असल्याने त्यांचा फोकस विचलित झालेला दिसतो. त्यांना कमी वेळात अनेक गोष्टी शिकायच्या असतात आणि म्हणूनच गुरुजी जे सांगतील ते फॉलो होईलच असे नाही. या पिढीत गुरू-शिष्य फोकस कमी झालेला दिसतो. त्यात आता माध्यमांची भर पडली आहे. माध्यमांमुळे कमी वेळात प्रसिद्धी मिळण्याची स्वप्न अनेक जण बघतात. परंतु शास्त्रीय संगीताचे तसे नाही. किमान बारा वर्षे रियाज केल्यानंतर मग तुम्हाला आपण आता काहीतरी करू शकतो, असा विश्वास निर्माण होतो.

तबला वादनात पाच प्रकार आहेत. स्वतंत्र तबला वादन, गाण्याला साथ-संगत, तिसरी वाद्यांना साथ-संगत, कथ्थक नृत्याला साथ-संगत आणि पाचवा प्रकार म्हणजे फ्यूजन. मी पाचही प्रकारांत तबलावादन करतो. एखादे वाद्य तुम्ही निवडले तर त्यातील संपूर्ण अभ्यास, सादरीकरण तुम्हाला जमले पाहिजे. परदेशातील मुलांना भारतातून शास्त्रीय संगीताचे, वादनाचे धडे देण्याचे काम मी गेल्या दहा वर्षांपासून करीत आहे. अमेरिकेतील मुलांना मी ऑनलाईन तबल्याचे प्रशिक्षण देतो.

मला भारत सरकार, सांस्कृतिक विभागातर्फे राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. अल्लाराखा यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणार्‍या युवा पुरस्कार, पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारी यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप मला मिळाली आहे. ज्यांना कलाक्षेत्रात काही करायच आहे, ज्यांना तबला शिकायचा आहे त्यांना हेच सांगेल की, गुरुंवर निष्ठा ठेवून ते जे काही शिकवतील ते एकाग्रतेने शिका. जे गुरुंची आज्ञा पाळतात, ते भविष्यात यशस्वी नक्की होतातच.

- Advertisment -

ताज्या बातम्या