तेजस पुरस्कार मुलाखत : परिस्थितीवर मात करण्याची जिद्द हवी- सचिन खराटे
स्थानिक बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : परिस्थितीवर मात करण्याची जिद्द हवी- सचिन खराटे

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर, 
जयपूरला एमएफआरटी पुरस्काराने सन्मानित,
ट्रेकिंगची आवड,
जास्तीत जास्त तरुणांनी उद्योजक व्हावे याकडे कल.

माझे संपूर्ण बालपण विदर्भातील अकोला जिल्ह्यात गेले. आम्ही सख्खे चार बहीण-भाऊ. मी दहा वर्षांचा असताना माझ्या आईचे निधन झाले. त्यानंतर मी व माझा भाऊ आम्ही वडिलांकडे राहायचो तर माझी बहीण आमच्या नातेवाईकांकडे. काही वैयक्तिक कारणांमुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे मला लहानपणापासूनच व्यवसाय करण्याची सवय लागली. ज्या वस्तू विकणे शक्य आहेत त्या सर्व मी विकायचो. बरोबरीने माझे शिक्षण सुरू होते. गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूलमधून माझी दहावी पूर्ण झाली. मी वयाच्या सोळाव्या वर्षी नाशिकमध्ये आलो. इथे आल्यानंतर पैसे कमावण्यासाठी मी अनेक हॉटेल्समध्ये वेटरचे काम केले. नंतर ओळखी वाढत गेल्या. मित्र मिळाले. माझ्या मित्रांनी मला खूप साथ दिली.

त्यावेळी इन्शुरन्सची एजन्सी दिली जायची. माझ्या मित्राने माझे पैसे भरून मला ती मिळवून दिली. त्यावेळीसुद्धा मी अर्धा वेळ हे काम करायचो आणि बाकी वेळ हॉटेलमध्ये काम करायचो. असे जवळजवळ २००७-२००८ पर्यंत सुरू होते. त्यानंतर जनरल इन्शुरन्सची एजन्सी घेतली आणि म्युच्युअल फंडकडे वळलो.

२००८ साली मी माझे स्वतःचे वरद फायनान्शिअल सर्व्हिसेस म्हणून ऑफिस सुरू केले. २०१२ हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. त्यावर्षी मी सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर ही पदवी मिळवली. याचा माझ्या व्यवसायात खूप फायदा झाला.

एलआयसीसाठी विविध प्रदर्शनात स्टॉल लावणारा त्यावेळी मी एकमेव होतो. मी असे लोक शोधायचो ज्यांना एलआयसीकडून पैसे घ्यायचे आहेत. एलआयसी पैसे द्यायला तयार असायची पण ते लोक शोधणे अवघड असायचे. मी आजही मला वेळ मिळेल तेव्हा आणि चांगल्या प्रदर्शनात माझ्या व्यवसायाचा स्टॉल लावतो.

मला सतत समाजासाठी, माझ्या गुंतवणूकदारांसाठी काही ना काही नवीन करायला आवडते. म्हणून व्यवसायाबरोबरच ब्लॉग लिहितो. माझे यू ट्यूब चॅनल आहे. मी पुस्तक लिहिले आहे. अधूनमधून वृत्तपत्रात लेखही लिहितो. जेणेकरून फक्त माझ्या गुंतवणूकदारांनाच नाही तर इतर सगळ्यांना या क्षेत्रातले बारकावे समजतील आणि त्यांना त्यांच्या पैशांचे नियोजन व्यवस्थितरीत्या करता येईल. मी मिळकतीतला काही भाग सामाजिक कामासाठी वापरतो.

आजवरच्या प्रवासात खूप आव्हानांना सामोरे जावे लागले. मी नाशिकला आलो तेव्हा माझ्या कोणीच ओळखीचे नव्हते. त्यामुळे ओळखीतून काम मिळणे शक्य नव्हते. स्वतःच संपूर्ण विश्व शून्यातून निर्माण करायचे होते आणि स्वतःला सिद्ध करायचे होते. परंतु वस्तुस्थिती लक्षात घेऊन परिस्थितीवर मात करण्याची आपली क्षमता असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू, असा मला विश्वास आहे.

अनुभव आपल्याला खूप काही शिकवतात. मलासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. पण काही क्षण, काही अनुभव आपण कधीही न विसरणारे असतात. २०१६ मध्ये सहारा स्टारमध्ये हजार ते बाराशे लोकांसमोर माझी उद्योजक म्हणून मुलाखत घेण्यात आली होती. ती संधी, तो अनुभव माझ्यासाठी आजही तेवढाच ताजा आहे. तो दिवस मला नेहमी एक प्रेरणा देतो. त्याचवर्षी मला जयपूरला एमएफआरटी सन्मान पुरस्कारदेखील मिळाला. वेटर ते उद्योजक या प्रवासासाठी मला तो पुरस्कार मिळालेला.

माझ्या कामाबरोबरच मला ट्रेकिंगची आवड आहे. ट्रेंडी ट्रेकर म्हणून आमचा ग्रुप आहे. ट्रेकिंगला जाणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे या दोन गोष्टींसाठी माझा रविवार राखीव असतो. वाचन करणे, व्यायाम करणे, कोणतेही काम कलात्मकरीत्या करायला मला आवडते.

यानिमित्ताने मी तरुणांना असे सांगेन की आठ तासांच्या नोकरीबरोबरच स्वतःचे काहीतरी वेगळे काम करा. काहीतरी व्यवसाय करा. कितीही स्मार्ट वर्क केले तरीही हार्ड वर्क महत्त्वाचे असते. तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा तेवढाच वापर करता यायला हवा. भविष्यात ऐशोआरामात जीवन जगायचे असेल तर कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही.

Deshdoot
www.deshdoot.com