Friday, April 26, 2024
Homeनाशिकतेजस पुरस्कार मुलाखत : सामाजिक बुद्धिमत्ता वाढावी- परेश चिटणीस

तेजस पुरस्कार मुलाखत : सामाजिक बुद्धिमत्ता वाढावी- परेश चिटणीस

नाशिक | प्रतिनिधी 

१३ वर्षांपासून हस्ताक्षर तज्ञ आणि विश्लेषक म्हणून कार्यरत,
रंग, लोगो, लग्न आदी विविध क्षेत्रात हस्ताक्षर विश्लेषणातून मार्गदर्शन,
परेश चिटणीस अ‍ॅकेडमीतून विदेशातही कामकाज सुरू,
‘अक्षरे सांगती स्वभाव’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाची निर्मिती,
१०० हून शाळांमध्ये हस्ताक्षराचे कार्यक्रम.

- Advertisement -

मी मूळचा नाशिकचा. माझे शालेय शिक्षण सेंट झेवियर्समध्ये झाले. आरवायकेमधून बीएससी मायक्रोबायोलॉजी आणि बीएससी केमिस्ट्री, एमएससी केमिस्ट्री केले. पुढे पुणे विद्यापीठातून एमबीए एचआर (मानवसंसाधन) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. विद्यापीठातूनच पुण्यातल्या फोर्स मार्शल कंपनीत नोकरी लागली. या दरम्यानच्या काळात छंद म्हणून हस्ताक्षर विश्लेषणाचा कोर्स केला. लोकांचा स्वभाव समजून घेणे, लोकांशी संवाद साधणे आदी गोष्टी आधीपासूनच आवडत होत्या.

पुढे नोकरी एचआरमध्येच असल्यामुळे लोकांची निवड करताना हस्ताक्षर आणि सही विश्लेषणाची मदत घेतली. याचा कंपनीलाही मोठा फायदा झाला. कारण हस्ताक्षर, सही यांच्या विश्लेषणातून व्यक्ती कंपनीत काम करेन की नाही, कंपनीशी एकनिष्ठ असेल राहील का आदी गोष्टी समजून घेण्यासाठी मदत झाली. त्यावेळी या संदर्भातले काही मोड्यूल्स बनविले. पुढे याच विषयाचा अधिक अभ्यास करायचा असे ठरवून पुस्तकांचे वाचन, काही कोर्सही केले. त्यावेळी मी मिलिंद राजोळे यांच्याकडे शिक्षण घेतले. पुढे पाच वर्षे त्यांच्यासोबत सहाय्यक म्हणूनही काम केले. त्यांच्यासोबत काम करताना खूप शिकायला मिळाले. तेव्हा सुभाष घई, विजय भटकर, अनुपम खेर अशा अनेक लोकांबरोबर काम करता आले.

पुढे काही कारणामुळे नाशिकला यायचे ठरले. पण याच विषयात काम करायचे असे ठरवून कामाला सुरुवात झाली. यातून मग परेश चिटणीस अ‍ॅकेडमीची सुरुवात झाली. या अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून हस्ताक्षरांशी संबंधीत वेगवेगळे कोर्सेस शिकविले जातात. आता आम्ही काही अ‍ॅप विकसित केले आहेत. सोबतच काही ऑनलाईन कोर्सही आहेत. याशिवाय कंपन्यामध्ये नोकर भरतीसाठी हस्ताक्षर तपासणी करून सल्ला देतो. कारण कामासाठी निवड करताना स्वभावाचा कुठेच विचार केला जात नाही. मुलाखतीच्या वेळी स्वभाव ओळखता येत नाही. अशावेळी तिथे आम्ही मदत करतो. सध्या मुंबई, पुणेसह दुबई, अबुधाबी शहरांमध्ये काम करत आहोत. अनेकदा डॉक्टर, पालक, शिक्षक, लग्न, मानसोपचार तज्ञ आदी मंडळी आमच्याकडे येतात. हस्ताक्षर, सही यांच्या विश्लेषणातून त्याच्या रोजच्या कामात खूप मदत होते. आता अनेकदा लग्न ठरविण्याआधी काही जोडपीसुद्धा आमच्याकडे येतात. आम्ही त्यांना फक्त एकमेकांचे स्वभाव सांगतो. जेणेकरून त्यांना आधीच पूर्वकल्पना येते.

मुळात हे शास्त्र असल्यामुळे त्यामध्ये फसवण्याचा प्रश्नच येत नाही. याच शास्त्रावर आधारित वेगवेगळे कार्यक्रम शंभरहून अधिक शाळांमध्ये घेतले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना हस्ताक्षरांचे महत्त्व लक्षात येईल. आतापर्यंत अगदी महापालिका शाळांपासून इंटरनॅशनल स्कूलपर्यंत हे कार्यक्रम झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ग्रामीण भागातील शाळांचाही समावेश आहे. याच हस्ताक्षर आणि सही यावर आधारित ‘अक्षरे सांगती स्वभाव’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. हा टॉक शो विविध शहरांमध्ये होत असतो.

एकीकडे हे काम करत असताना हस्ताक्षर, सही यांच्या विश्लेषण करून पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत करत असतो. आठवड्यातून किमान दोन पुस्तकांचे तरी वाचन होत असते. मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचतो. हिंदी भाषेतल्या कविता आवडतात. माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत मला कुटुंबाची मोलाची साथ मिळाली आहे. पत्नी गौरवी मला अ‍ॅकेडमीच्या कामात मदत करते. तिचा सक्रीय सहभाग आहे. तर आई-वडिलांनीही नेहमीच प्रोत्साहन दिले. आजच्या तरुण वर्गाला सांगावेसे वाटते की, आपला सोशल इंटेलिजन्स वाढवायला हवा. समाजामध्ये कसे वावरायला हवे, याकडे लक्ष द्यायला हवे, अनेकदा तरुणाई मानसिकरित्या सक्षम वाटत नाही. बुद्धिमान नक्कीच असतात. मात्र भावनिकरित्या खूप एकटी वाटतात. त्यांनी त्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

- Advertisment -

ताज्या बातम्या