तेजस पुरस्कार मुलाखत : यशस्वी वकिलीसाठी  ‘थ्री डी’ गरजेचे! – अ‍ॅड. जयदीप वैशंपायन
स्थानिक बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : यशस्वी वकिलीसाठी ‘थ्री डी’ गरजेचे! – अ‍ॅड. जयदीप वैशंपायन

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी .

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वकिली क्षेत्र निवडले,
अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे वकील,
लॉन टेनिसचे खेळाडू.

मचे कुटुंब जवळपास १५० वर्षांपासून नाशिकमध्ये आहे. आमचा जुन्या नाशकात वाडा आहे. त्यामुळे वाडा संस्कृतीमध्ये माझे बालपण गेले. लहानपणी खूप उनाड होतो. याच्या पूर्ण विरुद्ध माझा मोठा भाऊ. आजी, आजोबा, वडील, मोठा भाऊ असे आमचे कुटुंब. माझे १० वीपर्यंतचे शिक्षण पेठे हायस्कूलमध्ये झाले. नंतर ११वी, १२ वी कॉमर्स केले. आणि १२ वीनंतर एनबीटी लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. माझ्या वडिलांचे स्वप्न होते की, आमच्यापैकी कोणीतरी वकील व्हावे. म्हणून मी या क्षेत्रात आलो. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भाऊ गाडगीळ हे माझे पाहिले गुरू. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केले. त्यांनी मला सांगितले की, एक वर्ष जर सातत्याने या कामात राहिलास तर तुला यश मिळणे कठीण नाही.

हे सारे करताना माझ्यापुढे अनेक आव्हाने होती. याआधी कधीही मी कोर्टाची पायरीसुद्धा चढलेलो नव्हतो. या क्षेत्राची काहीही पार्श्वभूमी नव्हती. घराच्या काही केसेस नाहीत, मित्रदेखील तसे नाहीत आणि आता या क्षेत्रात करिअर करायचे, वकील होऊन कोर्टात जायचे. हे खूप कठीण होते. निर्णय घेतल्यानंतर पहिल्या मिनिटापासून समोर खूप आव्हाने उभी होती. पण माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांनी मला सांभाळून घेतले. माझे गुरू, घरची मंडळी, मित्र पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्यामुळे मला या क्षेत्रात टिकून राहता आले.

आत्तापर्यंत मी एकूण ५०० क्रिमिनल केसेस हाताळल्या आहेत. मी महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स कॅपिटल लिमिटेड, टाटा मोटार्स लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड, कोटक महिंद्रा फायनान्स अशा अनेक कंपन्यांचा वकील म्हणून काम पाहिलेले आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिलेले आहे.

या क्षेत्रात काम करायचे म्हणजे रोजच नवनवीन अनुभव येतात. चांगले अनुभव म्हणजे या क्षेत्रात समाजासाठी खूप काम करायला मिळते. त्या लोकांचे खूप आशीर्वाद मिळतात. म्हणजे आपण त्यांच्यासाठी देव असतो. अक्षरशः आपल्यापेक्षा वयाने मोठी असणारी माणसे आपले पाय पकडतात. त्याचबरोबर येथे काम करताना समाज कोणत्या दिशेने चालला आहे, हे समजते आणि प्रत्यक्ष बघायला मिळते. अत्यंत गरीब माणसापासून श्रीमंत माणसापर्यंत सगळे कोर्टात येतात. आपण आपल्या मर्यादेमध्ये, चौकटीमध्ये राहून काम केले तर सगळेच अनुभव छान वाटतात.

पण एखाद्या केसचा निकाल आपल्या विरुद्ध लागला तर वाईट अनुभव येण्याची शक्यता असते. सुरुवातीला पहिल्या३-४ वर्षांत मला ते खूप जाणवले. आपली हार पचवण्याची क्षमता वकिली क्षेत्र देते, असे मला फार वाटते. हे क्षेत्र खूप चांगले आहे. आपल्याला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवणारे, वैयक्तिक आयुष्य घडवणारे वकिली ह्या क्षेत्रापेक्षा दुसरे क्षेत्र नाही. माणसाची विचारसरणी बदलते. एखादा वकील त्याच्या बुद्धिमत्तेने काय करू शकेल, आपण अंदाज लावू शकत नाही. या क्षेत्राला कोणत्याही सीमा नाहीत.

वकिली व्यतिरिक्त लॉन टेनिस मला प्रचंड आवडते. रात्री कितीही उशीर झाला, पाऊस, थंडी, वारा काहीही झाले तरीही मी रोज सकाळी दीड ते दोन तास लॉन टेनिस खेळतो. शाळेत असताना मी अनेक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचो आणि आजही स्पर्धांमध्ये खेळतो. त्याचबरोबर संगीत माझी दुसरी आवड आहे. माझी आजी ५०-६० वर्षांपासून रेडिओवर गायची. माझी १ आत्या आजही रेडिओवर गाते आणि दुसर्‍या आत्याचा मुंबईत जुन्या गाण्यांचा ऑर्केस्ट्रा आहे.

माझ्यासुद्धा हार्मोनियम आणि गाण्याच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या २ गोष्टींची मला अतिशय आवड आहे आणि मी ती जोपासतो.या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. मला माझ्या एका सरांनी सांगितले होते की, यशस्वी वकील व्हायचे असेल तर ३ डी आवश्यक आहेत. एक डेडिकेशन, ड्रेसिंग आणि डेस्टिनी. या तीन गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तुम्ही एक चांगले वकील बनू शकता. ह्याच 3 गोष्टी मीदेखील स्वतः आचरणात आणतो.

Deshdoot
www.deshdoot.com