तेजस पुरस्कार मुलाखत : समाज निरोगी राहावा म्हणून कार्यरत- डॉ. वैभव पाटील
स्थानिक बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : समाज निरोगी राहावा म्हणून कार्यरत- डॉ. वैभव पाटील

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

फिजिशियन म्हणून रुग्णसेवा,
मित्रांचे मिळून रुग्णालय काढले आहे,
वैद्यकीय क्षेत्रात आवडीने काम,
वर्षाला तीन-चार मॅरेथॉनमध्ये सहभाग,
वैद्यकीय सेवा रुग्णांसाठी वरदान.

माझे आई वडील दोघेही शिक्षक होते. माझे ११वी पर्यंतचे शिक्षण नांदगावला झाले. १२ वी मी धुळ्यामधून केली. तेव्हा मला अजिबात वाटले नव्हते की, मी डॉक्टर होईल. पण माझ्या आजोबांची इच्छा होती की, मी डॉक्टर व्हावे. म्हणून मिरज येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. २००२ साली मला एमबीबीएसची पदवी मिळाली. नंतर मी एक वर्षं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात काम केले. २००८ साली मुंबई सायन हॉस्पिटल येथून एम. डी. केले. आता मी फिजिशियन म्हणून नाशिकमध्ये काम करतो आहे.

जिल्हा रुग्णालयात काम करताना मला जाणवले की, आपल्याला कोणत्याही एका विषयात स्पेशलायझेशन केले पाहिजे. म्हणून मी मेडिसीन या विषयाचा अभ्यास करून, परीक्षा देऊन फिजिशियन झालो आणि त्यानंतर लगेचच वेळ वाया न घालवता स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. सुरुवातीला मी नाशिकमधील दहा हॉस्पिटल मिळून एकटा फिजिशियन होतो. त्यापुढच्या २ वर्षांत मी आणि माझे ७ मित्र मिळून आम्ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आणि ५० बेडचे सनराईज नावाचे हॉस्पिटल उभारले. २०१० पासून आम्ही ते व्यवस्थित चालवत आहोत.

सुरुवातीला नाशिकमध्ये काम सुरू करताना खूप आव्हाने होती. घरची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. त्यामुळे नाशिकला येऊन हॉस्पिटल उभारणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण माझे एक एक काम बघून मला पुढची कामे मिळत गेली. नाशिकमध्ये तशी मित्रमंडळी बरीच होती, पण आम्ही ८ मित्रांनी मिळून हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला. आज मला आमच्या सगळ्यांचा खूप अभिमान वाटतो की, आम्ही हॉस्पिटलसाठी घेतलेले कर्ज ७ वर्षांत पूर्णपणे फेडलेले आहे.या काळात अनेक चढउतार झाले. काही चांगले अनुभव आले तर काही वाईट. पण त्यातूनही शिकायलाच मिळाले. मला आठवते सुरुवातीला काम करत असताना माझ्या हाताखाली एकही पेशंट अ‍ॅडमिट झालेला नव्हता.

एक केस कायमची आठवणीत आहे. एका पेशंटचे रात्री २ च्या दरम्यान ऑपरेशन झालेले होते. माझ्या डॉक्टर मित्राचा मला काही वेळानंतर फोन आला की, तिला बोलता येत नाहीये. मी त्या पेशंटला पाहिले. माझ्या लक्षात आले की, ऍट्रोपिन नावाचे औषध दिले गेले असावे. नंतर चौकशी केली. जुनी औषध तपासली. तर त्यात आढळले की, एट्रोपिनसारखे औषध तिला भुलीमधून मिळाले होते. त्याचा परिणाम ४ तासांनंतर दिसायला लागला होता. पण मी आत्मविश्वासाने सांगितले की, पेशंट ६ तासांत बरी होईल. ते माझे नाशिकमधले पहिले पेशंट होते ज्याच्यावर मी एकट्याने सगळे उपचार केले होते. माझ्या निदानाप्रमाणे तो रुग्ण खरोखरच सहा-सात तासांनी बरा झाला. कुठलीही गुंतागुंत वाढली नाही. या केसमुळे माझा आत्मविश्वास वाढला.

या क्षेत्रात मी आवडीने काम करतो. माझे आयुष्य मी खूप आनंदाने जगतो. मला व्यायाम करायला आणि वाचायला खूप आवडते. मी मॅरेथॉनर आहे. २०११ पासून मॅरेथॉनमध्ये भाग घेतो. शालेय जीवनातदेखील मी राज्यस्तरावर खेळलेलो होतो. दरवर्षी मी ३-४ मॅरेथॉन करतोच आणि या सगळ्यासाठी वेळ हा काढावा लागतो. तुम्ही ज्या गोष्टीला महत्त्व द्याल त्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ असतोच.
जसे नाण्याला दोन बाजू असतात, तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. चांगली आणि वाईट. आजकाल डॉक्टरांविषयी फार चांगले बोलले जात नाही. रुग्णांना काही डॉक्टरांचे अनुभव चांगले येत नाही. अशा हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांमुळे सगळेच क्षेत्र वाईट असते असे नाही. हे तत्व फक्त वैद्यकीय क्षेत्राला नव्हे सगळ्याच क्षेत्रांना लागू आहे.

या क्षेत्रात येणार्‍या तरुण पिढीला मी एवढेच सांगेन की, आपल्यामुळे एखादे कुटुंब जर सुखी, निरोगी होत असेल तर यापेक्षा आपल्याला अजून काय हवे? आपली सेवा त्या लोकांसाठी वरदान ठरत असते. या क्षेत्रामुळे समाजासाठी आपल्याला काम करता येते. त्यामुळे या क्षेत्रात जरूर या. स्वतःसाठी आणि समाजासाठी काम करा. प्रामाणिक राहा.

Deshdoot
www.deshdoot.com