तेजस पुरस्कार मुलाखत : संगीत हाच माझा श्वास आणि ध्यास- डॉ. आशिष रानडे
स्थानिक बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : संगीत हाच माझा श्वास आणि ध्यास- डॉ. आशिष रानडे

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

शास्त्रीत लोकसंगीत आणि रागसंगीत या विषयावर डॉक्टरेट,
शास्त्रीत संगीतासाठी आकाशवाणीची ‘ए ग्रेड’,
अनेक नामांकित संगीत महोत्सवात सहभाग, दिग्गज मान्यवरांना साथसंगत,
कलाश्री संगीत अकादमीच्या माध्यमातून ज्ञानदान.

नेकांना संगीत क्षेत्राची आवड असते. मात्र त्यात कारकीर्द घडवून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता येते असे क्वचित घडते. माझ्या बाबतीत मात्र गुरुकृपेमुळे हे घडून आले. आता संगीत हाच श्वास, ध्यास, आवड आणि रोजगारसुद्धा आहे.  माझे बालपण मनमाडमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. घरात आजी गाण्याचे क्लासेस घ्यायची. आई-वडील दोघांनाही संगीताची आवड होती. त्यामुळे गाणे ऐकतच मोठा झालो. लहानपणापासून गायन, तबला आणि हार्मोनियमवादन शिकायला सुरुवात केली. फक्त आवड असल्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आणि बक्षिसे जिंकायची, असा सिलसिल्ला सुरू होता.

आठवीत शिकत असताना माझे गुरू प्रसिद्ध गायक, प्राध्यापक डॉ. अविराज तायडे यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली. ते बक्षीस वितरणासाठी आले होते. त्यावेळी मला त्यांच्या हस्ते बक्षीस मिळाले. तेव्हा त्यांनी गायनाकडे लक्ष दे, तुझा आवाज छान आहे, असे सांगत प्रोत्साहन दिले. मी मात्र त्यावेळी गायनाकडे खूप काही लक्ष दिले नाही. पुढे नाशिकच्या आरंभ महाविद्यालयात तबला शिक्षकाची नोकरी लागली. कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तायडे सरांशी भेट झाली. मग मात्र त्यांच्याकडेच गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

त्यानंतर सलग १५ वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल पद्धतीने शास्त्रीय संगीत शिकलो.त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त वेळ गुरू तायडे सरांबरोबर राहायला मिळाले. गुरूंसोबत वेगवेगळ्या मैफली, कार्यक्रम, यासाठी केलेला प्रवास यातून खूप शिकलो. आजही तायडे सरांसोबत विविध कार्यक्रमांमध्ये साथसंगत देतो. आता आमचे गुरू-शिष्याचे नाते खूप घट्ट झाले आहे. त्यांनीच प्रेरणा दिल्यानंतर गेली ६ वर्षे किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक आणि पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित आनंद भाटे यांच्याकडे किराणा घराण्याची तालीम घेत आहे.

संगीताचा अभ्यास पुढे सुरू ठेवताना लोकसंगीत आणि रागसंगीत या विषयावर अमरावती विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी संपादित केली. सोबतच शास्त्रीत संगीतासाठी अतिशय मानाची समजली जाणारी आकाशवाणीची ‘ए ग्रेड’ मिळवली आहे. शास्त्रीय गायनासाठी देशातील युवा कलाकारांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. एकीकडे स्वत: संगीताचे धडे शिकत असताना इतरांनाही शास्त्रीय संगीत देता यावे या उद्देशाने ‘कलाश्री’ या संगीत अकादमीची स्थापना केली.

या अकादमीच्या माध्यमातून दोनशेहून अधिक विद्यार्थी भारतीय शास्त्रीय संगीत शिकत आहेत. अकादमीच्या कामात माझी पत्नी दिव्या हिची पण मोलाची साथ आहे. या अकादमीच्या माध्यमातून शास्त्रीय गायन, अभंग आणि रागसंगीत, ख्याल गायन एक विचार अशा वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात. मला काही पुरस्कारही मिळाले आहेत. यात पं. गजानन बुवा जोशी स्मृती पुरस्कार, रोटरी क्लब नाशिकचा आदर्श शिक्षक पुरस्कार, संगीत यशवंत सुरश्री पुरस्कार, संस्कार भारती नाशिकचा आदर्श गुरू पुरस्कर यांचा समावेश आहे.

संगीताच्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेक नामांकित संगीत महोत्सवात शास्त्रीय गायन सादर करण्याची संधी मिळाली. सोबतच पं सुरेश तळवलकर, पं वेंकटेश कुमार, पं. अजय पोहनकर, पं. मुकुंदराज देव, पंडिता मंजिरी देव, पं. विजय कोपरकर अशा अनेक मान्यवर दिग्गज कलाकारांसोबत गायन आणि साथसंगत करण्याची संधी मिळाली.

संगीत हीच पहिली आवड आहे. संगीताशी निगडीत सर्वच गोष्टी मला आवडतात. मग गाणे असेल, वाद्य असतील. पुढे संगीत शिकवायलाही आवडते. याशिवाय गप्पा मारायलाही मला खूप आवडतात. यशाबद्दल बोलताना मी असे सांगेल की, माझ्या यशात माझ्या गुरूंचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मी फक्त चाललो. त्यामुळेच सगळे शक्य झाले. यासोबतच मला असे वाटते की, आयुष्यात संवादही खूप महत्त्वाचा आहे. सोबतच आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत आणि सतत प्रयत्न करत राहायला हवे.

Deshdoot
www.deshdoot.com