तेजस पुरस्कार मुलाखत : शेतीकडे व्यवसाय म्हणूनच पाहा! – भाऊसाहेब मते
स्थानिक बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : शेतीकडे व्यवसाय म्हणूनच पाहा! – भाऊसाहेब मते

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय,
प्रयोगशील द्राक्ष उत्पादक,
युरोपीय देश, जर्मनी आदी ठिकाणी द्राक्षाची निर्यात,
‘द्राक्ष विज्ञान मंडळा’च्या माध्यमातून इतर शेतकर्‍याना मार्गदर्शन,
सेंद्रीय शेतीसाठी विशेष पुढाकार.

मी मुळचा नाशिक शहरालगत असलेल्या आडगावाचा. लहानपणापासून शेती पहातच मोठा झालो. घरात एकत्र कुटुंब आहे. घरात कायमच शेतीचं वातावरण आहे. म्हणूनच मग शेतीच्या गोष्टीच नेहमी कानावर पडल्या. शालेय शिक्षण आडगावा आणि बी कॉम केटीएचएम महाविद्यालयातून पूर्ण केलं. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे माझ्यासमोर दोनच पर्याय होते. नोकरी किंवा घरच्या लोकांसोबत गावात राहून शेती करणे. मी शेती करायचं ठरवलं. कारण मला मुळात विशेष करून द्राक्ष आवडायची.

आता रोजगारासाठी शेतीच करायची ठरवल्यावर त्याचं रितसर शिक्षण घ्यावं या विचारातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून तीन वर्षांचा कोर्स केला आणि पूर्ण वेळ शेती करायला सुरुवात केली. आमची सुमारे ६ एकर द्राक्ष बाग आहे. इतर शेतकर्‍यांप्रमाणे आमचीही शेती सुरु होती. शेतीची सूत्र हाती घेतल्यावर सर्वात आधी रासायनिक खतं, कीटकनाशकं आदींचा वापर कमी करायला सुरुवात केली. जमिनीचा पूर्ण अभ्यास केला. काही तज्ञ आणि जाणकारांचं मार्गदर्शन घेऊन हळूहळू बदल करायला सुरुवात केली. मात्र लगेच काही हाती लागलं नाही. पण साधारपणे तीन वर्षांनंतर बदल दिसू लागले. द्राक्षाची गुणवत्ता खूपच सुधारली. द्राक्ष अधिक रसाळ झाली. गुणवत्ता सुधारल्यामुळे द्राक्ष एक्स्पोर्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

काही अडचणीनंतर द्राक्षाची निर्यात सुरु झाली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात करत आहे. काही युरोपीय देश, जर्मनी आदी ठिकाणी माझी द्राक्ष जातात. शेतीमध्ये मी केलेले बदल बघून अनेकांनी माझ्याशी चर्चा करून बदल करायला सुरुवात केली आहे. आता अशाच प्रयोगशील शेतकर्‍यानी एकत्र येऊन ‘द्राक्ष विज्ञान मंडळा’ची स्थापना केली आहे. या माध्यमातून शेती विषयाच्या विविध पैलूवर आमची विचारांची देवाणघेवाण सतत सुरु असते. शेतीमध्ये केलेले विविध प्रयोग, अडचणी आम्ही एकमेकांना सांगतो. अनुभवांची देवाणघेवाण होऊन सगळ्यांनाच मदत होते. माझ्याकडे आधी काळी आणि थॉमस अशी दोन्ही द्राक्षे होती. काही वर्षांपूर्वी काळ्या द्राक्षाची छाटणी केली. द्राक्षासोबत वर्षभर काही फळभाज्या आणि पालेभाज्या घेत असतो. जेणेकरून कामगार वर्गाला काम मिळते. सोबत आर्थिक उत्पन्नही मिळते.

शेतीबरोबर मला स्वयंपाक करायलाही आवडतो. अगदी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही. यातूनच काही वर्षांपूर्वी शेती सोबतच भाडे तत्वावर हॉटेल सुरु केले होते. मात्र आर्थिक समीकरण जुळून आली नाही. त्यामुळे हॉटेल बंद केले असून आता पूर्ण शेतीच करतो. अनेकदा शहरी लोक आवड म्हणून काही एकर शेती करण्याचा प्रयत्न करतात. पण शेती कधीही फोन वरून आणि व्हिडीओ वरून करता येत नाही. प्रत्यक्ष शेतात राबल्याशिवाय शेती समजत नाही आणि शेती करता ही येत नाही. त्यामुळे शेती काही छंद म्हणून जोपासायची मुळीच गोष्ट नाही.

मला तरुणांना सांगावेसे वाटते की, शेतीकडे व्यवसाय म्हणूनच पाहा. इतर व्यवसायाप्रमाणे इथेही जोखीम आणि संघर्ष आहे हे पूर्णपणे लक्षात घ्या. शेतीसाठी केलेल्या खर्चाचा लेखाजोखा मांडा. कुठल्या ठिकाणी अनावश्यक आणि टाळता येणारा खर्च आहे तो शोधा. मुख्य म्हणजे सेंद्रीय शेती करा. यामुळे जमीन सकस राहाते आणि खर्चही कमी होतो. निर्सगाचा लहरीपणाचा विचार करूनच शेतीचे नियोजन करा. वातावरणाचा परिणाम जसा आपल्या शरीरावर होतो. अगदी तसाच पिकांवर होतो. ही साधी गोष्ट लक्षात घ्या. जसे थंडीत आपण पाणी कमी पितो. मग पिकांनाही हाच नियम लागू आहे. त्याकाळात जास्त पाणी देण्याची गरज नाही. शेतकर्‍याना कर्जमाफी देण्यापेक्षा पिकांना हमीभाव देण्याची गरज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com