Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतेजस पुरस्कार मुलाखत : प्रत्येकाला न्याय मिळायलाच हवा! – अ‍ॅड.पंकज चंद्रकोर

तेजस पुरस्कार मुलाखत : प्रत्येकाला न्याय मिळायलाच हवा! – अ‍ॅड.पंकज चंद्रकोर

नाशिक | प्रतिनिधी 

१५ वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत,
सर्वात तरुण सरकारी आणि विशेष सरकारी वकील,
केबीसी, मैत्रेय, हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून दिले.

- Advertisement -

मुळात मनामध्ये अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड असल्यामुळे माझा वकिलीचा प्रवास सुरू झाला. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळायलाच हवा यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. यातूनच सदरच्या न्यायदानाला वेगळी दिशा देण्याचा माझा प्रयत्न आहे.

मी मूळचा नाशिकचाच. माझा जन्म अतिशय सामान्य घरातला आहे. दहा बाय दहाचे आमचे घर होते. आम्ही दोन भाऊ. वडिलांचा मालवाहतुकीचा व्यवसाय होता. माझे शालेय शिक्षण रंगूबाई जुन्नरे शाळेतून झाले. पुढे बी.कॉम केटीएचएम कॉलेजमधून आणि एनबीटी लॉ कॉलेजमधून कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. त्यावेळी वडिलांनी एका ओळखीच्या व्यक्तीला इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या व्यवसायासाठी पैसे दिले, मात्र त्याने फसवणूक केली. मग वडिलांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वेळोवेळी वडिलांसोबत कोर्टात जाणे होई. तिथे न्यायालयीन कामकाज जवळून पाहिल्यानंतर वकिली करण्याचा निर्णय घेतला.

२००५ मध्ये एलएलबी पूर्ण केल्यानंतर अ‍ॅड. श्रीधर माने यांच्याकडे कामाचा अनुभव घेतला. दरम्यानच्या काळात सुमारे नऊ वर्षांनंतर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला. पुढे २०११ मध्ये सरकारी वकील म्हणून माझी नेमणूक झाली. 2017 मध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

गेल्या १५ वर्षांच्या वकिली व्यवसायामध्ये अनेक गाजलेले खटले हाताळले असून पीडितांना न्याय मिळून दिला आहे. विशेष म्हणजे आर्थिक गुन्ह्यांमधील सगळे खटले शेकडो कोटींच्या रकमेचे आहेत. आर्थिक फसवणुकीच्या खटल्यांमध्ये आरोपीला अटक आणि शिक्षा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळायला हवा, ही बाब सर्वात महत्त्वाची असल्याचे माननीय कोर्ट यांच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

मैत्रेय प्रकरणामध्ये १५ जिल्ह्यांमधल्या शेकडो लोकांना फसवण्यात आले. यात पहिल्या सहा महिन्यांत सुमारे २५ हजार गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यात यश मिळाले. आगामी काही महिन्यांमध्ये लाखो गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळणार आहे. अशाचप्रकारे केबीसी, इमू, हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंटआदी प्रकरणांमध्ये गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देत न्यायदानाला वेगळी दिशा देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. माझ्या याच कामाचे कौतुक तत्कालीन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, रवींद्र सिंघल, खा. हेमंत गोडसे व अनेक मंत्र्यांनी केले आहे.

माझ्याकडे आलेल्या खटल्यांपैकी ७५ टक्के खटले निकाली काढले असून पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. आर्थिक फसवणुकीबरोबरच महिला अत्याचार, ग्राहक संरक्षण, कामगार, जमीन खरेदी विक्री, महसूल, अपघात आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील खटले मी यशस्वीरीत्या लढवले आहेत.

वकिली व्यवसायात यश मिळवताना कुटुंबियांनी मोलाची साथ दिली. वडिलांचा कायमच पाठिंबा राहिला. पत्नीदेखील वकील असल्यामुळे तिचीही नेहमीच मदत होते. व्यवसाय सांभाळून मला वाचनाचीसुद्धा आवड आहे. ऐतिहासिक पुस्तके आवडीने वाचतो. याशिवाय फिरायला आणि क्रिकेट खेळायलाही आवडते.

आजच्या तरुणवर्गाला मला सांगावेसे वाटते की, खूप अभ्यास करा, यशाचा कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही. नेहमी जीवनात सकारात्मकता बाळगा. कुठल्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा. जीवन खूप सुंदर आहे. सोबतच कुठेही गुंतवणूक करण्याआधी संबंधित लोक आणि संस्था यांची पूर्ण माहिती करून घ्या. मोठ्या जाहिराती, मोठी बक्षिसे, मोठ्या रकमा यांना बळी पडू नका. बँक, संस्था यांची पत समजून घ्या.

मुळात फसवणूक करणार्‍या आर्थिक संस्था असे काय करतात की अवघ्या वीस दिवसांत त्या तुम्हाला तुमचे पैसे दामदुप्पट करून देऊ शकतात हे समजून घ्या. जेणेकरून फसवणूक होणार नाही. आपणच शहाणे झालो तर आपली कोणीही फसवणूक करू शकणार नाही, याची खूणगाठ मनाशी बांधा.

- Advertisment -

ताज्या बातम्या