तेजस पुरस्कार मुलाखत : आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय- डॉ. विभव येवलेकर
स्थानिक बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय- डॉ. विभव येवलेकर

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

श्री आदिमा आयुर्वेदीय विद्या चिकित्सालयाचे प्रधान चिकित्सक,
‘शरीर क्रिया’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण,
प्राध्यापक म्हणून एसएमबीटी आयुर्वेद महाविद्यालय, इगतपुरी येथे कार्यरत,
गेल्या 7 वर्षांपासून प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरू,
विविध ठिकाणी पेपरचे सादरीकरण, सेमिनार, कार्यशाळा, प्रश्नमंजुषामध्ये यशस्वी सहभाग.

रात वडील अनंत येवलेकर हे मराठीचे प्राध्यापक आणि पत्रकार असताना माझा ओढा मात्र कायमच विज्ञानाकडे होता. त्यामुळे विज्ञानाशी निगडीत पण एमबीबीएस करायचे नाही, असे मी आधीच ठरविले होते. यातून पुढे भारतीय चिकित्सा पद्धती म्हणून ओळख असलेल्या आयुर्वेदामध्ये संशोधन आणि काम करण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि माझा प्रवास सुरू झाला.

कुठल्याही सामान्य मुलाप्रमाणे माझेही बालपण अगदी तसेच होते. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे शाळेत मी शिकलो. तेव्हापासूनच मला वाचनाची सवय लागली. सावानामुळे ती अधिक वाढली. घरातले वातावरणही कायमच अभ्यासाला पोषक आहे. वडिलांनीही कुठल्याही गोष्टीची बंधने ठेवली नाहीत. त्यामुळे आम्हा दोन्ही भाऊ आणि बहीण यांना नेहमीच स्वातंत्र्य मिळाले.

पुढे आरवायके महाविद्यालयात गेलो. तिथे विज्ञानाशी अजून गट्टी जमली. आचार्य सरांनी प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान कसे काम करते, हे शोधायला शिकवले. यातूनच चिकित्सक वृत्ती वाढली. त्यामुळे विज्ञानाशी संबंधित असेच काही पुढे करायचे हे ठरविले होते. वेगळी वाट शोधून भारतीय चिकित्सा पद्धती म्हणून ओळख असलेल्या आयुर्वेदात काम करायचे ठरविले. नाशिकच्या गणेशवाडीतील आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस प्रथम क्रमांक मिळवत पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतले. यात ‘शरीर क्रिया’ या विषयात विशेष अभ्यास केला.

एकीकडे शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. बीएएमएस शिकत असतानाच नामवंत वैद्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुण्यातही कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तिथे आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या ग्रंथांचा सखोल अभ्यास झाला. पुढे रुग्णसेवेसाठी कार्यक्षेत्र निवडण्याची वेळ आली तेव्हा नाशिकमध्ये रुग्णसेवेच्या असलेल्या संधी आणि गरज ओळखून नाशिकमध्येच काम करायचे ठरविले. 2017 मध्ये श्री आदिमा आयुर्वेदीय विद्या चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सुरू केले. माझी पत्नी गीताचेसुद्धा आयुर्वेदामध्ये पदव्युत्तर शिक्षण झाले असून तीदेखील सोबतच काम करते. याशिवाय ज्ञानदानाच्या हेतूने इगतपुरीच्या एसएमबीटी आयुर्वेद महाविद्यालयात ‘शरीर क्रिया’ विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही मी कार्यरत आहे.

नाशिक आणि पुण्यात आयुर्वेदाचे शिक्षण घेत असताना विविध ठिकाणी पेपरचे सादरीकरण, सेमिनार, कार्यशाळा, प्रश्नमंजुषा यामध्ये यशस्वी सहभाग घेतला. सोबतच विविध पुरस्कार आणि शिष्यवृत्त्यादेखील वेळोवेळी प्राप्त केल्या आहेत. यामुळे देखील स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मदत झाली. आत्मविश्वासही वाढला. आता नाशिकमध्ये ‘आयुर्वेदा अध्ययन ग्रुप’ स्थापन केला असून या अंतर्गत आयुर्वेदाच्या प्रत्यक्ष चिकित्सेचा अनुभव विद्यार्थ्यांना करून देत आहोत.

आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना सुरुवातीपासून वाचनाची आवड असल्याचा खूप फायदा झाला. सोबतच भाषादेखील उत्तम असल्यामुळे ग्रंथ समजून घेण्यासाठी खूप मदत झाली. वाचनाबरोबर मला ट्रेकिंग, व्हॉयलीन वाजवायलाही आवडते. वेळ मिळेल तसे चित्रपट बघत असतो. अर्थात सायन्स फिक्शन जास्त आवडतात.

सोबतच आमच्या घरात कायमच कुत्री, मांजर, कबुतर यांचा वावर असतो. आमची कुत्री ही कुटुंबातीलच एक सदस्य आहे. त्यामुळे तिच्यासोबत खेळायलाही मला खूप आवडते.

गेल्या सात वर्षांपासून रुग्णसेवा देत असताना असे जाणवते की, रुग्णांचा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. आता पहिल्यांदाच आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी लोक येतात. रुग्णांची मानसिकता बदलली आहे. रुग्ण आयुर्वेदिक उपचारांकडे वळत आहे. हा खूप मोठा बदल आणि सकारात्मक बदल आहे, असे मला वाटते.

Deshdoot
www.deshdoot.com