डॉ. सागर केळकर
डॉ. सागर केळकर
स्थानिक बातम्या

तेजस पुरस्कार मुलाखत : रुग्णसेवा हेच माझे ध्येय- डॉ. सागर केळकर

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकचे प्रख्यात सांधेरोपणतज्ज्ञ अशी ओळख ,
दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रियेत विशेष प्राविण्य,
सांधेबदल, बोन ट्युमर या शस्त्रक्रियांचा अनुभव ,
लंडन येथून शिक्षण पूर्ण,
सामाजिक कामांमध्येही सहभाग.

वैद्यकीय क्षेत्रात डॉ. भरत केळकर आणि डॉ. मृणाल केळकर यांना मानाचे स्थान आहे. त्यांचा मुलगा आणि डॉक्टर म्हणून वावरताना त्यांचाच आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळेच रुग्णसेवा हेच माझे ध्येय आहे.आई आणि वडील दोघेही डॉक्टर असल्यामुळे घरात शिक्षणासाठी कायमच पोषक वातावरण होते. रंगुबाई जुन्नरे हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. आरवायके महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईच्या एमजीएम कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. वसंतराव पवार मेडीकल कॉलेज नाशिकमध्ये एम. एस. केले. पुढे शिष्यवृत्ती मिळवून दुर्बिणीद्वारे सांध्याची शस्त्रक्रिया, सांधेबदल शस्त्रक्रिया आणि स्पोर्ट्स मेडिसीनमध्ये किंग्ज कॉलेज लंडनच्या प्रिन्सेस रॉयल हॉस्पिटल येथून शिक्षण घेतले. पुण्याच्या डॉ. सचिन तपस्वी यांच्या मार्गदर्शनाखाली फेलोशिप मिळवल्या.

शिक्षण आणि अनुभव घेतल्यानंतर प्रत्यक्ष रुग्णसेवेला सुरुवात केली. त्यावेळी मुंबई, पुणे आदी ठिकाणी काम करण्याची संधी नक्कीच होती. मी मात्र नाशिकमध्ये स्थायिक व्हायचे आणि काम करायचे, असे ठरवले. घरात आधीपासूनच हॉस्पिटल, आई आणि वडील यांचे मोठे नाव असे सगळेच होते. त्यामुळे रुग्णसेवा सुरू करताना काहीच अडचणी नव्हत्या. मात्र काम सुरू करताना थेट वडिलांसोबतच काम करणार आहोत, येणार्‍या रुग्णांचा विश्वास वडिलांवरच असणार आहे, यांची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे माझ्यासाठी अतिशय वेगळी आणि कठीण परिस्थिती होती. सुरुवातीला थोडा त्रास झाला, मग मात्र हळूहळू सगळे सुरळीत होत गेले. माझ काम पाहून रुग्णांचा माझ्यावरही विश्वास बसला. मी पण वडिलांसारखेच रुग्णांना बरे करतो, याचा लोकांनी अनुभव घेतला. आता माझी पण स्वत:ची ओळख निर्माण झाली आहे. रुग्ण थेट माझ्याकडे येतात. माझ्या रुग्ण सेवेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. हे बघून मलाही आपण आई-वडील आणि रुग्ण यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला असल्याचे जाणवते.

गेल्या तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया मी केल्या आहेत. यामध्ये दुर्बिणीद्वारे सांध्याची शस्त्रक्रिया, सांधेबदल, बोन ट्युमर, फ्रॅक्चर, अपघात अशा शस्त्रक्रियाचा समावेश आहे. सोबतच हजारो रुग्णांना सेवा दिली आहे. याशिवाय हॉस्पिटल आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थाकडून आरोग्य शिबिरे घेतली जातात. यात मी आवर्जून सहभागी होतो. या माध्यमातून ग्रामीण भागात रुग्णसेवा करता येते. एकीकडे रुग्णसेवेत स्थिरावत असताना आई-वडिलांबरोबरच पत्नी पूर्वा हिनेसुद्धा खूप मोलाची साथ दिली. सगळ्याचे नेहमीच प्रोत्साहन असते. मला फिरायला खूप आवडते. सोबतच ट्रेकिंगही करतो.

बदलत्या काळात डॉक्टर आणि रुग्ण यांचे नातेसुद्धा बदलत असल्याचे दिसते. रुग्णांचा डॉक्टरवर असलेला ‘विश्वास’ कमी होत आहे. अर्थात याला काही कारणेसुद्धा नक्की आहेतच. आता रुग्णाकडे अनेक पर्याय अगदी सहज उपलब्ध असतात. पूर्वी डॉक्टर मला बरच करणार याच भावनेने रुग्ण येत होता. आता हे चित्र नक्कीच बदलले आहे. अनेकदा रुग्णांच्या मनात संशय, प्रश्न आणि अविश्वास असतात. अशावेळी खरी कसोटी लागते. मला हाच विश्वास परत आणायचा आहे. दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञान येत आहे. अनेक संशोधन होऊन नवीन साधनसामग्री, यंत्रे यांचा वापर वाढत आहे.

पण हे तंत्रज्ञान आणल्यानंतर त्याचा वापर करताना होणारा खर्च देण्याची अजूनही मानसिकता नाही. तंत्रज्ञानाचा वापर रुग्णांवरचे उपचार अचूक निदान, सहज आणि वेदना कमी करणारे उपचार यासाठी सहाय्यभूत ठरतो. यासंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी असे वाटते. जीवनात वाटचाल करता असताना आजच्या तरुणांना मला सांगावेसे वाटते की, आपल्या घडविणार्‍या आई-वडिलांना कधीच विसरू नका. जीवनात काम खूप महत्त्वाचे आहे, मात्र तो जीवनाचा एक भाग हे लक्षात घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सोबतच आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com