तेजस पुरस्कार मुलाखत : गुणात्मक रुग्णसेवेवर भर- डॉ. चंद्रशेखर पेठे

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमधील होप कॅन्सर इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा,
निष्णात कर्करोग तज्ञ म्हणून ओळख,
रुग्णांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अनेकदा मोफत उपचार,
उपचारांमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर.

मी मुळचा नाशिकचा. आई शिक्षिका आणि वडील इंजिनिअर आहेत. त्यामुळे घरात आधीपासूनच शिक्षणाला फार महत्त्व होत. घरात नेहमीच अभ्यासाचे वातावरण असायचे. त्यामुळे आठवी, नववीत शिकत असतानाच पुढे डॉक्टरच बनायचे असे ठरवले होते. त्यामुळे त्याच दिशेने प्रवास सुरू झाला. माझे शालेय शिक्षण रंगुबाई जुन्नरेमधून झाले आहे. पुढे आरवायकेमधून शिकलो. मग राज्यातल्या सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित अशा गव्हर्मेंट कॉलेज मिरज इथे पदवी घेतल्यानंतर पुढे सोलापूरच्या वैशंपायन कॉलेजमधून एमडी मेडिसीन पूर्ण केले. पुढे अहमदाबादमध्ये शिकलो.

त्यावेळी पीजी शिकण्याआधी ग्रामीण भागात एक वर्ष रुग्णसेवा देणे गरजेचे होते. कळवणजवळ खर्डा म्हणून छोटे खेडे आहे. वर्षभर तिथे काम केले. त्यावेळी खूप शिकायला मिळाले. देशातील आरोग्य व्यवस्थेची अवस्था समजली. मी गेलो त्यावेळी रोजची २० रुग्णांची ओपीडी होती. मी सोडले त्यावेळी ३०० रुग्णांच्या पुढे गेली होती. त्यावेळी केलेल्या कामातून एक गोष्ट ठरवून टाकली की, यापुढे सरकारी नोकरी करायची नाही. तिथे असलेल्या बंधनांमध्ये आपण काम करू शकणार नाही, हे पुरते कळाले. पुढे डीएम करण्याचा निर्णय पूर्ण विचार करूनच घेतला. त्यावेळी नाशिकमध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी कुठल्याही आधुनिक सोयी आणि तंत्रज्ञान नव्हते. हीच गोष्ट ओळखून शिक्षण झाल्यानंतर नाशिकमध्ये रुग्णसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये दोन वर्षे लेक्चरर म्हणून काम केले.

२०१० मध्ये नाशिकच्या एका मोठ्या खासगी रुग्णालयात रुग्णसेवा सुरू केली. पण रुग्णसेवा शासकीय किंवा खासगी, काही बंधने पाळावी लागतात. मनासारखे काम करता येत नाही, असाच अनुभव आला. मग स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करायचा निर्णय घेतला. मग कुठलीच बंधने राहिली नाहीत. मनासारखे काम करता येऊ लागले. हळूहळू कामाचा व्याप वाढला. सुरुवातीला रात्री उशिरापर्यंत ओपीडी सुरू असे. प्रचंड कामाची धावपळ असे. मग यातून सगळ्या गोष्टी शिकत नियोजनबद्ध कामावर भर दिला. पुढे डॉ. पेठे होप कॅन्सर इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरची उभारणी केली.

आता संख्यात्मक कामावर भर देण्यापेक्षा गुणात्मक कामावर अधिक भर देत आहे. माझी काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. एका दिवसात मोजक्याच रुग्णाची ओपीडी करतो. साधारपणे किमान पाऊण ते एक तास एका रुग्णाला देतो. रुग्णाला काय त्रास होतोय, काय सांगायचे, हे आधी जाणून घेतो. मग कॅन्सर म्हणजे काय आणि उपचार कसे करणार आहोत, याची सविस्तर माहिती सांगतो. माझ्या ओपीडीत कुठेही कॅन्सर शब्दाचा उल्लेख नाही. रुग्ण आल्यावर आधी त्याला कॉफी दिली जाते. त्या रुग्णाचा इतर रुग्णांशी संवाद होतो. तिथेच खरी उपचाराला सुरुवात होते. बैठक व्यवस्थाही वेगळी आहे.

अनेकदा उपचारासाठी आल्यानंतर रुग्णाकडे पैशांचा नसतात. सरकारकडून मिळणारी मदतही खूप कमी असते. अशावेळी गरजूंना ओळखीच्या माध्यमातून मदत करतो. साधारणपणे 40 टक्के ओपीडी फ्री असते. माझ्यासारख्या अनेक डॉक्टरांनी एकत्र येऊन रुग्णसेवेसाठी ग्रुप तयार केले आहेत. हे जाळे संपूर्ण राज्यभर पसरलेले आहे. ज्याच्या माध्यमातून रुग्णांना मदत करण्याचे काम सतत चालू असतात. गरजूंकडे पैसे नाहीत म्हणून त्यांचे उपचार थांबणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेतो.

या सगळ्या वाटचालीत पत्नी डॉ. अस्मिता पेठे हिची मोलाची साथ मिळाली आहे. वर्षांतून दोन मोठ्या सहली ठरवून करतोच. मला बॅटमिंटन खेळायला खूप आवडते. साधारपणे इयत्ता तिसरी ते एमडी मेडिसीनपर्यंत मी बॅटमिंटन खेळत होतो. मला इतरांना सांगावेसे वाटते की, रुग्णांवर उपचार करताना त्याला कशात चांगले वाटेल, याचा विचार करा, आपण असंख्य डॉक्टर्स आहोत, पण आपले ध्येय एकच आहे. तेव्हा एकत्र येऊन काम केले तर सगळ्यांनाच मदत होईल. आणि नेहमीच रुग्णाचा विश्वास जिंका, तिथेच आपण रोगावर विजय मिळवलेला असतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *