Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : गुन्हेगारांची रेखाचित्रे रेखाटण्या संदर्भातील स्वतंत्र अभ्यासक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : गुन्हेगारांची रेखाचित्रे रेखाटण्या संदर्भातील स्वतंत्र अभ्यासक्रम

पोलिसांना सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मदत

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुढील शैक्षणिक वर्षापासून गुन्हेगारांची रेखाचित्रे रेखाटण्यासंदर्भातील स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांना मदत होणार आहे.या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पोलीस संशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार केला जाणार आहे. त्याअंतर्गत विद्यापीठात रेखाचित्र तयार करण्यासाठीच्या प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम राबवण्याचे नियोजन आहे.

विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तपासाच्या प्रक्रियेत पोलिसांकडून संशयितांचे रेखाचित्र तयार केले जाते. सद्यपरिस्थितीत संशयितांचे रेखाचित्र तयार करण्यासाठीचा अभ्यासक्रम उपलब्ध नाही. त्यामुळे फार थोडे रेखाचित्रकार या क्षेत्रात काम करीत आहेत. अनेक गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना रेखाचित्राची मदत होते आणि संशयितांचा माग काढता येतो. या पद्धतीने अनेक गुन्हेगारांना गजाआडही करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना रेखाचित्र कलाकारांची मोठ्या प्रमाणात गरजही आहे.

काहीवेळा वर्णनावरून तर काहीवेळा ‘सीसीटीव्ही’ चित्रिकरणाच्या आधारे संशयितांचे रेखाचित्र तयार करावे लागते. विद्यापीठात पोलीस संशोधन केंद्राच्या सहाय्याने रेखाचित्र अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होऊ शकेल. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील साऊथ वेस्टर्न युनिव्हर्सिटीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह विविध अभ्यासक्रम राबवण्यासाठी तयारी दर्शवण्यात आली आहे. या विद्यापीठात न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक) शाखेतील संशोधन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पुढील टप्प्यात पोलीस संशोधन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि साऊथ वेस्टर्न युनिव्हर्सिटी एकत्रितपणे न्यायवैद्यक शास्त्रासंबंधित अभ्यासक्रमही राबवता येऊ शकेल, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या