शाळांना दंड अन शिक्षकांवर कारवाईची भाषा बंद करा!
स्थानिक बातम्या

शाळांना दंड अन शिक्षकांवर कारवाईची भाषा बंद करा!

Abhay Puntambekar

आढावा बैठकीत शिक्षकांच्या तक्रारीनंतर शिक्षक आमदार दराडे यांच्या कडक सूचना

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून शाळांना विविध कारणे पुढे करत दंड ठोठावला जातो तसेच शिक्षक व लिपिकांना कारवाईच्या धमक्या दिल्या जातात.हा प्रकार चुकीचा आहे.मंडळ आणि शिक्षक विद्यार्थी विकासाचे काम करत असल्याने एकमेकांना सहकार्य करत सामंजस्याने कामे मार्गी लावा,अशा सक्त सूचना देत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी कार्यालयातील लिपीकांकडून शिक्षकांना होणारी अरेरावी,कामे न करणे,फाईली अडविणे या मुद्यांवरुन अधिकार्‍यांंची चांगलीच झाडाझडती घेत खडेबोल सुनावले.शिक्षकांशी चांगले वागा, फाईली अडवू नका, अशा सूचनाही त्यांंनी यावेळी दिल्या.

नाशिक येथील विभागीय कार्यालयात आमदार दराडे यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, नितीन उपासाणी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि.२१)ही बैठक झाली.केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक यांना पेपर तपासणी कामातुन मुक्त करण्याचे आदेश अध्यक्ष सचिव यांनी यावेळी दिले.मान्यतावर्धीत व कायम करण्यासाठी दंड रक्कम माफ करून फाईलचा प्रवास शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे न देता थेट विभागीय मंडळात देऊन दंड आकारणी न देता दोन हजार रूपये देऊन मान्यता वर्धीत व कायम करण्याची सुचना मुख्याध्यापक संघाचे सचिव एस .बी. देशमुख यांनी मांडली. हा प्रश्न मंत्रालयातुन सोडवण्याचे आश्वासन आमदार दराडे यांनी बैठकीत दिले.

मागील सभेचे इतिवृत्त न मिळाल्याने निदर्शनास आणून देत, शिक्षक सेनेचे संजय चव्हाण यांनी महामंडळाचा भोंगळ कारभार उघडीस आणला. दिव्यांग शिक्षक, दुर्धर आजाराने त्रस्त शिक्षक यांनाही परीक्षा कामातुन मुक्त करण्याची सुचना संघाचे अध्यक्ष एस .के. सावंत, मोहन चकोर, एस .बी. शिरसाठ, बाळासाहेब सोनवण यांनी मांडली. यास सचिवांनी तत्वत: मान्यता दिली. नविन केंद्र देताना शिक्षणाधिकारी यांच्या शिफारशिने देणे, यासारख्या विषयांवर वादळी चर्चा झाली. पुन्हा शिक्षक आमदारांनी मंडळातील सर्व कर्मचार्‍यांची बैठक घेऊन सर्वांना मुख्याध्यापक शिक्षक यांना चांगल्या वागण्याच्या कानपिचक्या दिल्या.

बैठकीस संजय चव्हाण, एस .के. सावंत, एस .बी. देशमुख , एस .बी. शिरसाठ , राजेंद्र सावंत , पुरुषोत्तम रकीबे , मोहन चकोर , बी .के. नागरे , भरत गांगुर्डे , कलीम शेख , एन.वाय. पगार , एम.व्ही.बच्छाव , आर .एस. गायकवाड,वाघ ,राजेंंद्र महात्मे,शिवाजी गाडेकर .एम.एन. देशमुख , विजय म्हस्के आदी उपस्थित होते.

दिव्यांग शिक्षकांना वगळा
बैठकीमध्ये अपंग संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी अंध अल्पदृष्टी आणि अस्थिव्यंग या शिक्षकांना व दुर्धर आजाराने पीडित असतील त्यांना दहावीच्या आणि बारावीच्या पर्यवेक्षण आणि उत्तर पत्रिका तपासणी कामातून मुक्तता द्यावी,अशी मागणी लावून धरली.यावेळी एसएससी बोर्डाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील,सचिव नितीन उपासनी यांनी दिव्यांग शिक्षक आणि दुर्धर आजाराने पिडीत यांना या कामातून वगळले जाईल,असे आश्वासन दिले.

Deshdoot
www.deshdoot.com