Thursday, April 25, 2024
Homeनाशिकराज्यस्तरीय वकील परिषद : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेहेर सिग्नल ते सीबीएस मार्ग...

राज्यस्तरीय वकील परिषद : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेहेर सिग्नल ते सीबीएस मार्ग बंद

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन आणि नाशिक वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शहरात शनिवार व रविवारी (दि. १५ व १६) पहिली राज्यस्तरीय वकील परिषद घेतली जाणार आहे. या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने शनिवारी (दि.१५) दुपारी दोन ते रात्री दहा आणि रविवारी (दि.१६) सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेपर्यंत सीबीएस ते मेहेर सिग्नल या मार्गावरील दुतर्फा वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

या मार्गाऐवजी चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. दरम्यान, परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, बैठक व्यवस्था, मंडप, वाहनतळाच्या व्यवस्थेचा अंतिम आढावा घेतला जात आहे.

जिल्हा न्यायालयाच्या आवारात होणार्‍या पहिल्या राज्यस्तरीय वकील परिषदेसाठी शनिवारी (दि.१५) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्यासह इतर न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. तसेच रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असून न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भुमीपूजन करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने जिल्हा न्यायालयातील अंतर्गत परिसरात डांबरीकरण, न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीस रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच मुख्य मंडपासह इतर मंडप उभारण्यात आले आहेत. उपस्थित वकिलांसाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून शहर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या