ना दारूविक्री करणार, ना पिऊ देणार; उत्पादन शुल्कची ढाबे चालकांंकडून हमीपत्रे
स्थानिक बातम्या

ना दारूविक्री करणार, ना पिऊ देणार; उत्पादन शुल्कची ढाबे चालकांंकडून हमीपत्रे

Abhay Puntambekar

नाशिक । खंडू जगताप

मद्यामुळे होणारे रस्ते अपघात कमी करण्यासाठी नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ढाब्यावर ‘ना दारू विक्री करणार, ना बाहेरून आणलेली दारू पिऊ देणार’ असे हमीपत्रच लिहून घेतले जात आहे. या मोहिमेस सुरुवात झाली असून यासाठी अधिकारी ढाबे चालकांची जनजागृती करत आहेत.

जिल्हा, राज्य तसेच देशात रस्ते अपघातांची संख्या मोठी असून यामध्ये मृत्यू होणार्‍यांचे प्रमाण लाखोच्या घरात आहे. महामार्गांगवरील अपघात टाळण्यासाठी शासन विविध उपक्रम राबत आहे. तसेच मागील दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवरील मद्यविक्री करणार्‍या दारू दुकानांवर कडक निर्बंध लादले होते.

महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आत असलेली मद्यविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला होता. यातून मग अनेकांनी पळवाटा शोधून काढल्या; तर दुसरीकडे गुपचूप दारूविक्री, तस्करीचे प्रमाण वाढले होते. यानंतर यामध्ये शिथिलता देण्यात आली. परंतु यामुळे पुन्हा रस्ते अपघात रोखण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली.

रस्ते तसेच महामार्गांवर झालेल्या भीषण अपघांमध्ये अनेकदा चालकाने मद्यप्राशन केल्यानेच अपघात झाल्याचे प्रमुख कारण समोर आले आहे. जिल्ह्यात हॉटेल व ढाब्यांची संख्या हजारोच्या घरात आहे. बहुतांंश ढाब्यांना कुठलाही परवाना नाही, मद्य परवाना दुरचा भाग आहे. असे असताना अशा ठिकाणांवर सर्रास छुप्या पद्धतीने देशी, विदेशी दारू विक्री होते.

जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, पंचवटी, सप्तशृंगी अशी मुख्य देवस्थाने, तसेच मोठ्या प्रमाणात प्रेक्षणीय स्थळे, निसर्ग-पर्यटन, वाईनरी असल्याने बाहेरून येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. देवस्थाने वगळता इतर पर्यटनांसाठी आलेले बहुतांश पुरुष मंडळी आनंद लुटण्यासाठी मद्यसेवन करत असल्याचे वास्तव आहे. त्यांना महामार्गाच्या कडेलाच ढाब्यांमध्ये सहज दारू उपलब्ध होते.

जिल्ह्यात मुळातच रस्ते अपघाताची संख्या मोठी आहे. यात मद्यसेवनामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मनोहर आंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी सर्व मार्गावरील ढाब्यांचे सर्वेक्षण केले असून त्यांची जनजागृती सुरू केली आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतली जात आहेत. यामुळे ढाबेचालकांवर एक प्रकारे बंधन राहून चालकांना मद्य विक्री न झाल्याने अपघात तसेच अपघातातील मृतांची संख्याही घटेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

अपघात टाळण्यास मदत
जिल्ह्यातील ढाब्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ढाबे चालकांची सकारात्मक जनजागृती करून त्यांना याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. या मोहिमेतून ढाब्यावर जेवणासाठी अगर मुक्कामी थांबणार्‍या वाहन चालकांना मद्य न मिळाल्याने अशा वाहनांचे संभाव्य अपघात टळण्यास तसेच जीवित हानी रोखण्यात मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील अवैध मद्यविक्रीला आळा बसणार आहे.
– अर्जुन ओहोळ, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादनशुल्क

सर्व विनापरवानाच
शहर तसेच मोठी गावे वगळता जिल्ह्यात रस्तोरस्ती ढाबे तसेच हॉटेल आहेत. या हॉटेल तसेच ढाब्यांना शॉप अ‍ॅक्ट, अन्न बनवणे व विक्री करणे, मद्यसाठा तसेच विक्री असे कोणेतेही परवाने नसतात. तसेच ढाब्यावर कामगाराच कार्यरत असतात. अनेकदा अवैद्य मद्यविक्री प्रकरणी कारवाई करण्याच्या वेळी कोणीही पुढे येऊन ढाबा आपलाच असल्याचे सांगते. तसेच कोणतेही परवाने नसल्याने कारवाई करण्यातही अडचणी येतात. अशा ढाबे तसेच हॉटेलांना किमान अन्न व औषध प्रशासनाचा तरी परवाना बंधनकारक करणे आवश्यक असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com