अधू दृष्टीचा त्रास असलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका
स्थानिक बातम्या

अधू दृष्टीचा त्रास असलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी
अधू दृष्टी, तसेच ‘सेरेब्रल पाल्सी’चा त्रास असलेल्या सिंधुदुर्ग येथील विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेसाठी मोठया अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने (एसएससी) उच्च न्यायालयात दिली.

विशेष म्हणजे असा त्रास असलेल्या विद्यार्थ्यांनी नियोजित मुदतीत अर्ज केल्यास त्यांनाही मोठया अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करण्यात येईल, असे मंडळाने प्रामुख्याने स्पष्ट केले. त्यामुळे ३ मार्चपासून सुरू होणार्‍या दहावीच्या परीक्षेला बसणार्‍या या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेंगुर्ला येथील या विद्यार्थिनीला अधू दृष्टीचा त्रास आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय समितीकडून तिला दोन वेळा त्याबाबतचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. त्यामुळेच दहावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मोठया अक्षरात उपलब्ध करण्याची मागणी तिन मंडळाकडे केली होती. मात्र ती अमान्य करण्यात आल्याने तिने पालकांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी या विद्यार्थिनीला मोठया अक्षरांतील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आदेश मंडळाला देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठाने परीक्षा मंडळाचे म्हणणे मान्य करत याचिका निकाली काढली.

अधू दृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना मोठया अक्षरातील प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारचा अध्यादेश असल्याची बाब या विद्यार्थिनीच्या वकिलांनी गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. १६ ऑक्टोबर २०१८ रोजी शासनाने त्याबाबतचा अध्यादेश काढला होता. असे असतानाही या विद्यार्थिनीला भिंगाचा वापर करण्याचा सल्ला मंडळाने दिला होता.

Deshdoot
www.deshdoot.com