आरोग्य महोत्सवाला मालेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
स्थानिक बातम्या

आरोग्य महोत्सवाला मालेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

Abhay Puntambekar

देशदूतची सामाजिक बांधिलकी उल्लेखनीय : मान्यवरांकडून कौतूक

मालेगाव । प्रतिनिधी

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दै. ‘देशदूत’ तर्फे आयोजित महिला आरोग्य महोत्सव व बचत गटांच्या जत्रेला मालेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो महिला आणि विद्यार्थिनींनी आरोग्य तपासणी करून घेतली. तपासणीसाठी महिलांनी रांगा लावल्या होत्या. येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात आयोजित आरोग्य महोत्सवाचे पं.स. सभापती सुवर्णाताई देसाई, प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे, लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा निरुपमा कासलीवाल, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा संगीता परदेशी, देशदूतचे महाव्यवस्थापक आर.के.सोनवणे यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्र सृष्टीचे नाव घ्यावे लागते. बातमी प्रसारीत करण्याची विविध माध्यमे अस्तित्वात आली असली तरी वृत्तपत्र सृष्टीचे स्थान यत्किंचित कमी झालेले नाही. सामाजिक बांधिलकी जपण्यात नाशिकच्या मातीत नावारूपास आलेल्या ‘देशदूत’चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्या विविध आजारांनी त्रस्त असतात. मात्र त्याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नसला तरी ही अडचण ‘देशदूत’ने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून लक्षात घेत महिलांसाठी आरोग्य महोत्सवाचे आयोजन करीत तज्ञ डॉक्टरांतर्फे त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केले जात असलेल्या महोत्सवास सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. बचत गटांच्या जत्रेव्दारे महिला सक्षमीकरणाचे काम ‘देशदूत’ करत असून ते निश्चितच स्तुत्य असल्याचे पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक बांधिलकीचा वसा
विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाव्दारे आघाडीवर असलेल्या महिलांमध्ये स्वत:च्या आरोग्याबाबत मात्र कमालीची उदासीनता दिसून येत असल्याने महिलांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘देशदूत’ने आरोग्य महोत्सवाचा राबविलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे लायन्स क्लब मालेगाव साऊथच्या माजी अध्यक्षा निरूपमा कासलीवाल यांनी यावेळी सांगितले. गत ५० वर्षापासून ‘देशदूत’ परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे. केवळ व्यावसायिक विचार न करता सर्वच क्षेत्रांना विधायक दिशा देण्याचे काम ‘देशदूत’ करत आहे. सामाजिक बांधिलकीचा हा वसा सारडा परिवारातील तिसरी पिढीही जपत आहे, हे निश्चितच विशेष व भूषणावह म्हणावे लागेल, असे कासलीवाल यांनी सांगितले.

वाचकांशी बांधिलकी कायम
उत्तर महाराष्ट्रात विकासाचा दूत मानले जात असलेल्या ‘देशदूत’ने गत ५० वर्षाच्या वाटचालीत वाचकांशी बांधिलकी कायम ठेवली आहे. महिला आरोग्य शिबीर व बचतगटांच्या जत्रेव्दारे ‘देशदूत’ परिवाराने हे दाखवून दिले आहे. स्वत:कडे बघण्यास वेळ नसल्याने महिला आज विविध आजारांनी त्रस्त असतात. व्यस्तता व कंटाळा यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळते. ‘देशदूत’ने आरोग्य महोत्सवाव्दारे महिलांसाठी आरोग्याची काळजी घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तज्ञ डॉक्टर आज ‘देशदूत’मुळे उपलब्ध झाले असल्याने या संधीचा विद्यार्थीनी व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला देवरे यांनी केले.

महिलांचा आरोग्यदूत
शिक्षण, नोकरी व कुटूंबाची काळजी घेणार्‍या महिला असो की तरूणी त्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतांना दिसून येत नाही. त्यामुळे विविध आजारांनी त्यांना बाधित व्हावे लागते. ‘देशदूत’ने महिलांच्या या अडचणी लक्षात घेत आरोग्य महोत्सवाचे आयोजन करीत तज्ञ डॉक्टरांतर्फे उपचार केले जात असल्याने ‘देशदूत’ महिलांसाठी आरोग्यदूत ठरला असल्याचे इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा संगीता परदेशी यांनी सांगितले.

नामको हॉस्पिटलचे फिजिओथेरपी तज्ञ डॉ.रोहन देव यांनी महिलांच्या मान, पाठ, कंबर दुखीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रसूतीनंतर महिलांमध्ये सांध्यांचे विकार जास्त प्रमाणात आढळतात, महिलांनी योग्य व्यायाम केल्यास हे दुखणे टाळता येते.
स्त्रीरोग तज्ञ डॉ. श्रद्धा वाळवेकर म्हणाल्या की, नियमित मासिक पाळी हे स्त्रीच्या उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. मातृत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे मात्र आता मातृत्वासाठी उपचाराची गरज भासू लागली आहे. सकस आहार, योग्य व्यायाम यामुळे वंध्यत्व टाळता येते. आता नैसर्गिक प्रसूती पेक्षा सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण वाढलेले दिसते. मुलींनी घरातील अंग मेहनतीची कामे केल्यास नैसर्गिक बाळंतपण होण्याची शक्यता वाढते. देशदूतच्या जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने यांनी प्रास्ताविकात आरोग्य महोत्सवाचा उद्देश विषद केला. मालेगाव कार्यालय प्रमुख हेमंत शुक्ला यांनी आभार मानले.

आरोग्य तपासणीसाठी सकाळपासून विद्यार्थिनी व महिलांनी गर्दी केली होती. शेकडो महिलांनी वजन, उंची, बीएमआय, डोळे, सांध्यांच्या विकारांची तपासणी करून घेतली. नामको हॉस्पिटलचे फिजिओथेरपीस्ट डॉ.रोहन देव यांनी मान, पाठ, कंबर, सांधेदुखीची तपासणी करून उपचार केले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रद्धा वाळवेकर यांनी महिलांच्या विकारांवर मार्गदर्शन व उपचार केले. डॉ. नवले, डॉ.जाधव, डॉ.उन्नती कुलकर्णी यांनीही तपासणी करून उपचार केले. महेश अहिरे, रत्नपारखी सिस्टर, गाडगीळ, कुसुम महांतो, ज्योतिका गावीत, वैभव चव्हाण, आकाश पिंगळे यांनी सहकार्य केले.

दै.’देशदूत’च्या वतीने महाव्यवस्थापक आर.के. सोनवणे यांनी महिला महाविद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट दिले. प्राचार्य डॉ.देवरे व विद्यार्थीनींनी त्याचा स्वीकार केला.

बचत गटांच्या जत्रेत अनेक महिला बचतगटांनी हजेरी लावली. वस्तू खरेदी व खाद्य पदार्थांच्या स्टॅल्सवर मालेगावकरांनी गर्दी केली होती. बचतगटांच्या जत्रेत दत्तकृपा, अबोली, रामदास स्वामी, साईराम, भगवती, चाफा, वरदायिनी, धम्मदिप, एकदंत, खुशी, मोरिंगा प्लस, श्री गणेश, श्री स्वामी समर्थ, निर्भया, श्री स्वामी समर्थ (रावळगाव), ओमसाई हे महिला बचत गट सहभागी झाले होते. जत्रेत खाद्य पदार्थांची रेलचेल होती. विद्यार्थिनी व महिलांची खाद्य पदार्थांच्या स्टाल्सवर गर्दी झाली होती. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व्यवस्थापक रोहित कन्नोर यांनी बचतगट जत्रेस भेट दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘देशदूत’ चे वितरण अधिकारी विलास झगडे, उपसंपादक राजेंद्र जाधव, नरेंद्र महाले, वाल्मिक पगारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमप्रसंगी महापालिका क्षेत्रीय व्यवस्थापक फरहान काझी, उपप्राचार्य डी.ए.पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेते बापू धामणे, अमोल धामणे, पापा यादव, संतोष शर्मा, दिलीप शर्मा, उमराण्याचे पत्रकार विनोद पटणी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com