तर…बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार!
स्थानिक बातम्या

तर…बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार!

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

घोषित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी व घोषित केल्याप्रमाणे २० टक्के अनुदान दिले जावे, शंभर टक्के निकालाची अट रद्द करून राज्यातील सुमारे २२ हजार शिक्षकांना न्याय द्यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन देऊन मागणीची दखल न घेतल्यास इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व लेखी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला.

विभागीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालयावर मोर्चा काढून बहिष्काराचे निवेदन देण्याचे नियोजित असताना ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. परिणामी नाशिकसह, धुळे, जळगाव व नंदुरबार येथील जमलेल्या राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ईदगाह मैदानावर धरणे आंदोलन केले. याठिकाणी सुमारे २०० प्राध्यापकांनी आंदोलनात सहभाग घेऊन शासनाच्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

गेल्या पंधरा ते अठरा वर्षापासून राज्यातील उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक विनावेतन अध्यापन करत असूनही शासन तारीख पे तारीख धोरण अवलंबत आहे. मागील सरकारने १३ सप्टेंबर २०१९ रोजी राज्यातील १६३८ उच्च माध्यमिक शाळांना पात्र असल्याचे जाहीर करून आगामी अधिवेशनात निधीची तरतूद करून २० टक्के अनुदान देण्याचा शासन निर्णय काढला. मात्र त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नसल्याने शिक्षक आता मेटाकुटीला आले आहे त्यामुळे शासनाने आता निर्णय न घेतल्यास कुठल्याही परिस्थितीत आंदोलन केले जाणारच असा इशारा विभागाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी दिला.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुरवणी मागणीद्वारे निधीची तरतूद करण्याचे आश्वासन शिक्षक आमदारांच्या बैठकीत दिले आहे. मात्र त्याची पूर्तता न झाल्यास सत्तावीस तारखेला आझाद मैदानावर राज्यातील शिक्षक धरणे आंदोलन करणार असून त्यानंतर एक फेब्रुवारीपासून बारावीच्या सर्व परीक्षांवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा विभागीय कार्याध्यक्ष कर्तारसिंग ठाकूर यांनी दिला.

धरणे आंदोलनानंतर शिष्टमंडळाने मंडळाच्या कार्यालयात जाऊन सहाय्यक सचिव सोनवणे यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात विभाग अध्यक्ष दिनेश पाटील, विभागीय सचिव गुलाब साळुंके, राज्य सदस्य निलेश पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष निलेश गांगुर्डे, धुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र बच्छाव, प्रकाश तायडे, संदीप बाविस्कर, राजेंद्र साळुंखे, एस. के. कापुरे आदीं शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Deshdoot
www.deshdoot.com