‘जय शिवाजी’च्या जयघोषात दुमदुमली रामनगरी

‘जय शिवाजी’च्या जयघोषात दुमदुमली रामनगरी

मिरवणुकीत पारंपरिकतेवर भर; फुलांची उधळण

नाशिक। प्रतिनिधी

‘जय भवानी..जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा, फुलांची उधळण, ढोल-ताशांचा गजर जोडीला आकर्षक विद्युत रोषणाई आणि यामध्ये बेभान होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात शिवजयंती मिरवणूक पार पडली.

जुन्या नाशिकच्या वाकडी बारव येथून पारंपरिक मिरवणुकीला दुपारी साडेचार वाजता महापौर सतीश कुलकर्णी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त अमोल तांबे, माजी खासदार समीर भुजबळ, आ. देवयानी फरांदे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज सोनाली राजे भोसले, यश राजे पाटील, मनीषा भोसले-पाटील, मनजोत पाटील, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुनील बागुल, गटनेते सतीश सोनवणे यांच्यासह नाशिकमधील विविध पक्षांचे पदधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.

आजची मिरवणूक पूर्णपणे पर्यावरणपूरक डीजे व गुलालविरहित काढण्यात आली. दुपारी साडेचारपासून सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जहांगीर मस्जिद-दादासाहेब फाळके रोड-महात्मा फुले मार्केट-भद्रकाली मार्केट- बादशाही कॉर्नर- गाडगे महाराज पुतळा-मेनरोड- धुमाळ पाँईट-म. गांधी रोड-सांगली बँक सिग्नल-मेहेर सिग्नल-स्वामी विवेकानंदरोड (जुना आग्रारोड)-अशोकस्तंभ-नवीन तांबटअळी-रविवार कारंजा- होळकर पूल-मालेगाव स्टॅण्ड-पंचवटी कारंजा-मालवीय चौक- परशुरामपुरीया रोडने विसर्जन ठिकाण असा मिरवणुकीचा मार्ग होता.

मिरवणुकीत छत्रपती सेनेच्या नटनाद ढोल पथकाने भगव्या ध्वजांसह मानवंदना देऊन प्रारंभ केला. या मंडळाने पुष्परचनेत सजवलेल्या व जागतिक विक्रम करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीची प्रतिकृती साकारली होती. तर पारंंपरिक पेहराव केलेले शिवभक्त, महिला, ढोल पथक, भगवे ध्वज, हे खास आकर्षण होते. दुसर्‍या स्थानी स्वराज्य प्रतिष्ठान मंडळ होते. त्यांनी भव्य १० फूट उंचीची भवानी माता छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देतानाचा देखावा मूर्तीद्वारे साकारला होता. तर ढोलीबाजा, नाशिकची कावडी यावर तरुण थिरकत होते.

तिसर्‍या स्थानी जाणता राजा मित्रमंडळप्रणीत शिवाई फ्रेंड सर्कलने पारंपरिकवेशभूषा परिधान केलेले मावळे व अर्धाकृती महाराजांचा पुतळा साकारला होता. शिवसेनाप्रणीत अर्जुन कला, क्रीडा मंडळाने शिवरायांची पुष्पाच्या आसनावरील विराजमान शिवमूर्ती साकारली होती. ढोल पथकासह ढोलीबाजा त्यांचे आकर्षण होते.

तर गजानन महाराज मित्रमंडळ व सत्यम कला, क्रीडा मंडळाने महाकालीच्या पार्श्वभूमीवर सिंहासनारूढ शिवरायांची मूर्ती साकारली होती. यासह ढोल पथक, विद्यचत रोषणाई केली होती. मिरवणुकीत यंदा प्रथमच ग्लोबल हॉस्पिटलची अ‍ॅम्ब्युलन्स सहभागी झाली होती. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मार्गावर विविध मंडळांकडून मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते. शिवजयंती मिरवणुकीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, आरपीएफच्या पोलिसांसह माहिला पोलिसांच्या बंदोबस्तात ही मिरवणूक पार पडली.

हे ठरले आकर्षण
छत्रपती सेनेच्या वतीने जागतिक विक्रम केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीची १३ फूट लांब व १३० किलोची लोखंडी प्रतिकृतीचा मिरवणुकीत सहभाग केला होता. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी साकारलेली ही भवानी तलवार सीबीएस येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. यासह मिरवणुकीत साजरे करण्यात आलेले मर्दानी खेळ यामध्ये दांडपट्टा, चक्री, लाठी तसेच तोंडातून जाळ काढत केलेल्या कसरतींनी लक्ष वेधले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com