‘शेल्टर -२०१९’ला अभूतपूर्व प्रतिसाद; प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी ३०० घरांची विक्री;
स्थानिक बातम्या

‘शेल्टर -२०१९’ला अभूतपूर्व प्रतिसाद; प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी ३०० घरांची विक्री;

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शेल्टर प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी शेकडो घरांची नोंदणी झाल्याने व्यावसायिकांमध्येही कमालीचा उत्साह दिसून येत आहे.आकर्षक मांडणी व ग्राहकाभिमुख प्रकल्पांच्या उपलब्धतेमुळे शेल्टर प्रदर्शनाची गर्दी वाढताना दिसून येत आहे. सुमारे १०० बांधकाम प्रकल्पांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून १५ लाखांंपासून २ कोटी रुपयांपर्यंतची घरे उपलब्ध आहेत.

या प्रदर्शनाला दुसर्‍या दिवशी हजारो नागरिकांनी भेट देत प्रकल्पांची माहिती घेतली. या ठिकाणी घरांसोबतच गृहोपयोगी वस्तूंचा प्रदर्शनात सहभाग केल्याने लोकांना एकाच जागी सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने ग्राहकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. आकर्षक मांडणीतून उभारलेल्या स्टॉल्समुळे प्रदर्शनाला वेगळी उंची लाभल्याचे चित्र आहे.

या प्रदर्शनामुळे खर्‍या अर्थाने नाशिकच्या क्षमतांचे दर्शन घडत असल्याने प्रदर्शनातून ब्रॅण्डिंग नाशिकचा उद्देशही साध्य होणार असल्याचे क्रेडाई नाशिकचे सेक्रेटरी कृणाल पाटील यांनी सांगितले. या प्रदर्शनात गृहप्रकल्पांना पतपुरवठा करणार्‍या संस्थांचा सहभाग असल्याने घराला लागणारा मुख्य पतपुरवठा कसा, कोठे होऊ शकेल, प्रकल्पासाठी किती कर्ज आपल्याला घेता येईल याचा उलगडा लगेचच होणार असल्याने घर खरेदीचा निर्णय घेणे ग्राहकांना सोपे होत असल्याने नोंदणी गत्तिमान झाली आहे.

पहिल्याच दिवशी १०० घरांची नोंदणी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तर प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी मात्र हा आकडा तीनशेच्या वर गेल्याचे बोलले जात आहे. दि. १९ ते २२ दरम्यान भरवल्या गेलेल्या या प्रदर्शनाचा उद्या शनिवारी तिसरा दिवस असून औद्योगिक क्षेत्राला सुटी असल्याने प्रदर्शनाला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस राहणार असल्याने घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन क्रेडाई नाशिक मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर या प्रदर्शनाच्या यशाची चर्चा राज्यभर असून आज क्रेडाई महाराष्ट्र चे उपाध्यक्ष व क्रेडाई औरंगाबादचे माजी अध्यक्ष रवी वत्तमवार यांनी अनेक सदस्या सहित प्रदर्शनास भेट दिली.

ब्रॅण्डिंग नाशिक
नाशिकचे वैशिष्ट समाजापुढे सादर करण्यासाठी वॉव ही संकल्पना पुढे आणली गेलीे. या माध्यमातून शहर परिसरातील शेती व्यवसाय, धार्मिकता, शिक्षण व विकसनशीलता तसेच उद्योग व त्यांचा विकास, आयटी क्षेत्र, वाईन उद्योग, पर्यटन, विमानसेवा यांसारख्या विविध बलस्थानांना अतिशय स्पष्टपणे मांडून ‘ब्रॅण्डिंग नाशिक’ संकल्पना राबवण्यात येत आहे. या माध्यमातून शहराला राज्यासह देशस्तरावर लौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. हादेखील वॉव नाशिक नाऊ नाशिक या संकल्पनेचा भाग आहे. नाशिक कसे विस्तारणार आहे यावरील भाष्य या चित्रफितीद्वारे करण्यात आले आहे. नाशिकचे देशभर ब्रॅण्डिंग करण्याचा प्रयत्न प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यासाठी स्वतंत्र पॅव्हेलियनही तयार करण्यात आले आहे.

‘नाशिक पॅव्हेलियन’
‘नाशिक पॅव्हेलियन’ ही नवीन संकल्पना प्रदर्शनाचे आकर्षण आहे. त्यामध्ये काय पाहायला मिळणार आहे. भविष्यातील नाशिक कसे असेल याकरिता क्रेडाई राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर आणि क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांची संकल्पनेतून ‘नाशिक पॅव्हेलियन’ आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्यामध्ये नाशिकची वैशिष्ट्य, पर्यटन केंद्र, हवामान, उद्योग विकास, नाशिकची जगभर ओळख असलेली शक्तिस्थाने, आकर्षण यांच्यावर प्रभावीपणे माहितीपटातून संदेश देण्यात आला. यासोबतच आकर्षक वास्तुरचनेचा नमुना म्हणून उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षाची मांडणीही आधुनिकतेला साजेशी आहे. क्रेडाईने नव्या जगाच्या अपेक्षांची कास धरल्याचे दर्शन यात दिसून येते. आकर्षक मांडणी, आधुनिक रंगसंगती व सुयोग्य प्रकाश योजनेतून विविध तीन विभागांच्या माध्यमातून पाहुण्यांचे स्वागत केले जात असल्याने ते एक आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

क्रेडाई प्रकल्प अधिकृत, पर्यावरण नियमांचे पालन करून बांधलेले असून स्वच्छ, पारदर्शी व्यवहार, वेळेत घराचा ताबा यासह मुख्य म्हणजे ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास क्रेेडाईमध्ये ‘कस्टमर प्रिव्हेन्शन सेल’ कार्यरत आहे. ज्यामध्ये ग्राहक तक्रार नोंदवू शकतो. क्रेडाई याकामी मध्यस्थाची भूमिका घेऊन ग्राहकांचे म्हणणे ऐकून तडजोड, वाटाघाटीने समझोेता करते. प्रदर्शनासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. प्रदर्शनास भेट देणार्‍यासाठी क्यूआर कोड तसेच संगणकीकृत प्रवेश राहणार असून प्रत्येक ग्राहकाची माहिती विकासकांना, व्यवसायिकांना उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना एकाच छताखाली फ्लॅट, बंगला, प्लॉट, औद्योगिक प्लॉट, फार्म हाऊस तसेच गुंतवणुकीसाठी काही स्थावर मालमत्तांची माहिती मिळावी हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
– उमेश वानखेडे (अध्यक्ष क्रेडाई नाशिक)

क्रेडाई २०१९ मध्ये रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या उत्पादनांना ग्राहक एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. १६७ स्टॉल्स उभारले आहेत. ५५ खुल्या जागा व स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यासोबतच पतपुरवठा करणार्‍या संस्था या ठिकाणी आहेत. या प्रदर्शनाला चार दिवसांत एक लाखाहून जास्त लोक भेट देण्याची शक्यता आहे. डिजिटल यंत्रणांच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांच्या विक्रीसोबतच सिटी ब्रॅण्डिंग करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. नाशिक गॅलरीद्वारे नाशिकच्या क्षमता दाखवण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे. ‘वॉव नाशिक ते नाऊ नाशिक’ ही संकल्पना दाखवणारे प्रदर्शन ठरणार आहे.
– रवी महाजन (समन्वयक-शेल्टरप्रॉपर्टी एक्स्पो)

शहरात घडणार्‍या नवनवीन विकास प्रकल्पांसोबतच शहराच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून टाकल्या जाणार्‍या नव्या प्रकल्पांची माहिती देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण शहराला एकत्र करून नाशिकला प्रमोट करण्याचा या प्रदर्शनातून प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांपेक्षा नाशिकची गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न राहिला आहे. नाशिक हे घर घेण्यासाठी कसे उपयुक्त स्थान आहे याचे दर्शन या माध्यमातून आपण राज्याच्या पटलावर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यातूनच ‘वॉव नाशिक ते नाऊ नाशिक’ ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
– सुनील कोतवाल (समन्वयक-शेल्टर प्रॉपर्टी एक्स्पो)

विविध प्रकल्प मिळतील. ललित रुंग्ठा लॉंचिंगलाच पूर्ण इमारत बुक करण्याचा विक्रम केला आहे. लवकरच डॉक्टरांसाठंी प्रकल्प सादर केला जात आहे. त्यापाठोपाठ पुढील महिन्यात ‘नेव्हर बिफोर नेव्हर अगेन’या संकल्पनेला खरे करणारी योजना दाखल करणार आहोत.
– निखिल रुंग्ठा (ललित रुंग्ठा ग्रुप)

१९८९ पासून कार्यरत असलेल्या आमच्या प्रकल्पातून ५०-७० प्रकल्प पूर्ण मोठा ग्राहकवर्ग आहे. साईरत पूर्ण बुकिंग, साई अनंत प्राईड, सिन्नर पूर्ण बुक, मनपा रोडसमोर व्यावसायिक प्रकल्प स्टारप्लस सिन्नरमध्ये दोन नवे प्रकल्प लवकरच सादर होतील. त्यालाही ग्राहकांची चांगली मागणी, कालिकेसमोर लवकरच व्यावसायिक प्रकल्प देत आहोेत. अशा उपक्रमांतून चांगला प्रतिसाद मिळणार आहे. मागील सर्व शेल्टरपेक्षा या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
-दिनेश चांदे (दिपक डेव्हलपर्स)

यात काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सादर करीत आहोत. त्यात जीवनभाग व शुभारंभ हे बिग साईट बजेट फ्लॅट आहेत. या माध्यमातून ग्राहकांच्या बजेटमध्ये देण्याचा प्रयत्न राहिला आहे. २० ते ३० लाखांत छोटी घरे देत आहोत. काही व्यावसायिक प्रकल्प यात आहेत. या ठिकाणी घरांची माहिती संकलितपणे मिळणार आहे. – सुशील बागड (बागड प्रॉपर्टीज)

Deshdoot
www.deshdoot.com