आता शालिमार, मालेगाव बसस्थानकात शिवभोजन थाळी

आता शालिमार, मालेगाव बसस्थानकात शिवभोजन थाळी

नाशिक । प्रतिनिधी

शिवभोजन थाळीला वाढता प्रतिसाद बघता राज्यभरात या योजनेचा विस्तार केला जात आहे. नाशिक शहरात शालिमार परिसरात व मालेगावला नवीन बसस्थानक परिसरात शिवभोजन केंद्र सुुरु केले जाणार आहे. त्यामुळे शहर व जिल्हामिळून एकूण शिवभोजन केंद्राची संख्या ही आठवर पोहचली आहे.जिल्हा पुरवठा विभागाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून मंंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला आहे.

प्रजासत्ताकदिनी राज्यभरात शिवभोजन थाळी या योजनेचा शुभारंभ झाला. गोरगरिबांना व गरजूंना माफक दरात पोटभर जेवण मिळावे, हा त्या मागील हेतू होता. दहा रुपये थाळीचा दर ठेवण्यात आल्याने तिला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शहरात तीन व मालेगावला एक ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले होते.त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो आहे. या शिवथाळी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

राज्य सरकारने शिवथाळींची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतल्याने नाशिक जिल्ह्यात शिवथाळींची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे शिवथाळी केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे. शहरात शालीमार परिसरात तर मालेगावात नवीन बस स्थानक परिसरात शिवथाळी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने तयार केला आहे.

मालेगाव येथील नवीन बसस्थानक परिसरात शिवथाळी चालविण्याचे काम एका बचत गटाकडे दिले जाणार आहे. मालेगावमध्ये कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या एक शिवथाळी केंद्र सुरू आहे. परंतु आता बस स्थानक परिसरातही केंद्र सुरू होणार असल्याने या केंद्रांची संख्या दोन होणार आहे. प्रत्येक केंद्रावरून २०० थाळी याप्रमाणे दोन हजार थाळींचा दररोज लाभ देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com