जिल्ह्यात ६६३ बालके तीव्र गंभीर कुपोषित

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये कुपोषणाची समस्या अजूनही जैसे थे आहे.डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये जिल्ह्यात तब्बल दहा हजार १५६ बालकांचे वजन कमी आढळून आले.विशेष बाब म्हणजे आदिवासी भागांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर असतानाच शहरी व सुखवस्तू भागातही कुपोषित बालके आढळून आल्याने आरोग्य व महिला बालकल्याण विभागाकडून चिंता व्यक्त होत आहे.जिल्ह्यात तीव्र गंभीर कुपोषित(सॅम)बालकांची संख्या आदिवासी भागात ४७८ तर बिगर आदिवासी भागात १८५ अशी एकूण ६६३ इतकी आहे.

जिल्ह्याच्या आदिवासी भागातील नागरिक शेतीवर अवलंबून असल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे.त्यातही पोटभर अन्न पाणी नाही,आरोग्यविषयक जनजागृती कमी,अल्पवयात लग्न,गर्भारपण आणि त्यातूनच कुपोषण बालकांना जन्म देण्याचे प्रमाण अधिक आहे.याबरोबर आरोग्य सुविधांचा अभाव अशा गोष्टीही कुपोषणाला पूरक ठरत आहेत. कुपोषण निर्मूलन व्हावे,यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होऊनही आदिवासी भागांमध्ये कुपोषित बालकांना जन्म देण्याच्या परिस्थितीत अजूनही फारसा फरक पडत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांमुळे कमी वजनाच्या बालकांचे वजन वाढविण्यात यश मिळाले आहे.मात्र,आदिवासी भागापुरताच मर्यादित असलेला कुपोषणाचा विळखा आता बिगर आदिवासी तालुके व शहरी भागालाही बसत चालला आहे.

जिल्ह्यात मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २८२४ आहे तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 663 आहे.आदिवासी क्षेत्रांमधील एक लाख ५६ हजार ७१८ बालकांपैकी १ लाख ५० हजार ९८१ बालकांची तपासणी करण्यात आली.यामध्ये मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या २४ हजार २१६ इतकी असून तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या ६९४८ तर मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २०३८ इतकी आहे.तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४७८ इतकीआहे.

बिगर आदिवासी क्षेत्र
बिगर आदिवासी क्षेत्रातील प्रकल्पनिहाय मध्यम गंभीर कुपोषित बालके (मॅम)पुढील प्रमाणे.कंसात तीव्र गंभीर कुपोषित बालके(सॅम)- बागलाण १-१०२(३१),सिन्नर ०१-२९(३),सिन्नर२-५४),निफाड-९०(१०), मनमाड-९७(२६), पिंपळगाव बसवंत-११०(२६),येवला एक-१३(१), येवलादोन-३८(१८),नांदगाव-३९(२०), चांदवड एक-८५(१३), चांदवड दोन-७१(११),मालेगाव-३५(११),रावळगाव-२३(४).एकूण ७८६(१८५).

आदिवासी क्षेत्र
आदिवासी क्षेत्रातील प्रकल्पनिहाय मध्यम गंभीर कुपोषित बालके (मॅम)पुढील प्रमाणे.कंसात तीव्र गंभीर कुपोषित बालके(सॅम)-पेठ एक-१९६(६६),हरसुल-११३(४०),सुरगाणा-१६२(३७),बार्‍हे-६७(३८), इगतपुरी-८६(२०),इगतपुरी-८६ (२०),उमराळे-२६६(५६),कळवण एक-७७(१६), कळवण दोन- ६०(८),नाशिक-४७४(१२०),त्र्यंबकेश्वर- १८३ (३०) ,देवळा-१७५(१६),बागलाण दोन-८१(१८).एकूण-२०३८ (४७८).आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रांमध्ये एकूण २८२४(६६३).

जे बाल विकास अधिकारी कुपोषणासंदर्भात चांगले काम करून कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करतील.त्यांच्या पाठीशी महिला व बालकल्याण समिती राहील.मात्र,कामचुकार अधिकार्‍यांची गय केली जाणार नाही.
अश्विनी आहेर, सभापती महिला व बालकल्याण जि. प. नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *