सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : पुनर्मूल्यांकनासाठी शुल्कवाढ करण्याचा निर्णय
स्थानिक बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : पुनर्मूल्यांकनासाठी शुल्कवाढ करण्याचा निर्णय

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या मार्च-एप्रिलच्या परीक्षांपासून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत (फोटोकॉपी) आणि पुनर्मूल्यांकनासाठी शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.या दोन्हीसाठी अभ्यासक्रमनिहाय ५० रुपये शुल्क वाढविण्यात आले आहे. त्यामुळे आता फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क आकारले जाणार आहे.

विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास त्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना आधी छायाप्रत घ्यावी लागते. त्यात काही शंका असल्यास त्यानंतर पुन्हा पुनर्मूल्यांकनासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची पद्धत आहे.

पहिल्यादांच फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अशा दोन्ही शुल्कांत वाढ करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपीसाठी अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १०० रुपये, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५० रुपये शुल्क आकारण्यात येत होते; तसेच उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १५० रुपये, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २०० रुपये शुल्क आकारण्यात येत होते.

आता, नव्या निर्णयानुसार फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनासाठी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनासाठी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव परीक्षा व मूल्यमापन मंडळाने व्यवस्थापन परिषदेपुढे मांडला होता. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढीला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शुल्कवाढीचे परिपत्रक परीक्षा विभागाकडून नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावरून आता विद्यार्थी संघटनांकडून विरोध होणार असल्याचे दिसून येत आहे.

असे आहे नवे शुल्क
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका फोटोकॉपीसाठी : १५०रुपये.
अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका फोटोकॉपीसाठी : २०० रुपये.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी : २०० रुपये.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी : २०० रुपये.

Deshdoot
www.deshdoot.com