सातपूर बसस्थानकाचे काम कधी पूर्ण होणार?
स्थानिक बातम्या

सातपूर बसस्थानकाचे काम कधी पूर्ण होणार?

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

स्मार्ट सिटीच्या नियोजनात सातपूरच्या बसस्थानकाच्या उभारणीला बेजबाबदार नियोजन, अधिकार्‍यांची अडेल भूमिका व ठेकेदाराची संथगती यामुळे कमालीचा विलंब होत असून दिवसागणिक खर्चात वाढ होत असतानाही उभारणी मात्र ‘आस्ते कदम’ गतीनेच सुरू असल्याचे चित्र आहे.

निधी मंजूर झाल्याचे कारण देत २०१५ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातपूर बस स्थानकाचे घाईघाईत भूमिपूजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात या जागेच्या मोजणीसह विविध परवानग्या घेणे बाकी होते. मंजूर झालेल्या २ कोटींपैकी २५ लाख रुपये या कामावर खर्च झाल्याचे समजते. या कामात कालापव्यय झाल्याने उर्वरित कामासाठी निर्धारित खर्चात वाढ झाल्याने ठेकेदार मागे पळू लागले. अखेर ५० लाखांचा अतिरिक्त निधी विद्यामान आमदारांनी मंजूर करून आणला. त्यात बसस्थानकाचे बरेचशे काम झाले असले तरी तयार झालेल्या कामाव्यतिरिक्त बरेचशे काम अपूर्णच राहणार आहे.

या स्थानकात अद्याप विजेची फिटिंग, बसेससाठी पेव्हरिंग, प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था, रंगरंगोटी, कार्यालयाचे फर्निचर व विविध प्रकारचे सुशोभीकरण बाकी असल्याने आणखी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीनंतर खर्‍या अर्थाने बसस्थानकाचे काम पूर्ण होणार आहे. मात्र दोनवेळा अतिरिक्त निधी मिळवूनही तो तोकडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या नियोजनातील अभियंत्यांची भूमिकेबद्दल नागरिक शंका व्यक्त करीत आहेत.

बसस्थानक पूर्णत्वाचाच ध्यास
कोणतीही तयारी न करता केवळ घोषणाच केल्याने त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यात मोठा कालावधी गेला. त्यामुळे निर्धारित वेळेत काम होऊ शकले नाही. परिणामी खर्चात वाढ झाली. सातत्याने दोन वेळा अतिरिक्त निधी मिळवून आणला. आता काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. –आ. सीमा हिरे

तरीही गती संथच
बसस्थानकाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. विद्यार्थी वृद्ध व कामगारांंना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन मात्र आपल्या गतीनेच कामकाज चालवत असल्याने याची दाद कुठे मागावी. -नरेंद्र पुणतांबेकर (ज्येष्ठ नागरिक)

Deshdoot
www.deshdoot.com