Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकरोलिंग ड्रममुळे बदलले ठाणगावकरांचे आयुष्य

रोलिंग ड्रममुळे बदलले ठाणगावकरांचे आयुष्य

नाशिक । प्रशांत निकाळे

ठाणगावात सार्‍या स्त्रिया आपले काम लवकर पूर्ण करीत आहेत आणि स्वत:साठी काही अतिरिक्त वेळ देत आहेत. गावातील मुलींना आता शाळेसाठी उशीर होत नाही. मुली वेळेवर शाळेत जात आहेत, याचा गावकरीही आनंद व्यक्त करीत आहेत. ठाणगाव नावाच्या छोट्याशा गावचे हे सध्याचे चित्र बदलले आहे ते वेल्स ऑन व्हील्स संस्थेने.

- Advertisement -

ठाणगाव हे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सुमारे १२०० लोकांच्या वस्तीचे गाव. गावात पाणी भरण्यासाठी गावकर्‍यांना गावाबाहेर सुमारे एक किलोमीटर पायपीट करावी लागते. आता मात्र हे बदलण्यासाठी युनायटेड किंगडममधील फाऊंडेशन वेल्स ऑन व्हील्सने मदतीचा हात दिला आहे. या संथेने गावकर्‍यांना सुमारे ४५ लिटर पाणी वाहून नेणारी रोलर ड्रम दिले आहेत, ज्यात सुमारे चार हंडे पाणी सहज बसते. हे ड्रम ७ हजार किलोमीटरपर्यंत चालवू शकतात, असे संस्थेचे म्हणणे आहे. फाऊंडेशनने मार्चमध्ये आणखी ५५ ड्रमचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

फाऊंडेशनचे संस्थापक शाज मेमन यांनी म्हटले आहे की, लोकांच्या जीवनात त्वरित बदल व्हावे म्हणून मी वेल्स ऑन व्हील्सची स्थापना केली. मला माहीत आहे की, आम्ही काही मोठ्या समस्येचे निराकरण करीत नाही, परंतु हे मात्र नक्की आहे की, थोडा दिलासा यामुळे मिळतो. आधीच खूप त्रस्त असलेल्या लोकांच्या जीवनात हा छोटासा बदलही फरक पाडतो. संस्थेकडे एक संघटन आहे जे कामे सुनिश्चित करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करीत आहे.

गरजूंचे मूल्यांकन केले जाते आणि जशी मदत मिळेल तशी आम्ही गरजूंपर्यंत पोहोचवतो.हे रोलिंग ड्रम मिळाल्यानंतर  ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले व रोजच्या कामात बराच बदल झाल्याचे व्यक्त केले. विहीर गावापासून दूर असल्याने पाण्यासाठी प्रवास करवा लागतो. एका खेपेसाठी सुमारे अर्धातास जातो. रोलिंग ड्रममुळे त्यांच्या डोक्यावरचे ओझे खाली आले आहे आणि त्यात पाणी वाहून नेण्याची क्षमताही वाढली आहे. खेड्यातील मुलीही या उपक्रमाबद्दल आनंदी आहेत.

अ‍ॅलेक्सिस किंग्जची चॅरिटी कॉन्सर्ट

फाऊंडेशनने नामांकित ब्रिटीश बॅन्ड अलेक्सिस किंग्जचे चॅरिटी कॉन्सर्ट आयोजित केले आहे. बँड ठाणगावसाठी विशेष चॅरिटी कॉन्सर्ट सादर करणार आहे. बँडचा भारत दौरा संपल्यानंतर मार्चमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. याच कार्यक्रमाच्या वेळी फाऊंडेशन ग्रामस्थांना अजून ५५ ड्रम वाटप करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या