पुनर्मूल्यांकन शुल्कवाढ मागे घ्या; विद्यार्थ्यांची मागणी
स्थानिक बातम्या

पुनर्मूल्यांकन शुल्कवाढ मागे घ्या; विद्यार्थ्यांची मागणी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीच्या आणि पुनर्मूल्यांकनाच्या शुल्कात प्रत्येकी ५० रुपयांनी वाढ केल्याचा निर्णय अन्यायकारक आहे. विद्यापीठ ही विद्यार्थ्यांची पिळवणूक करून अवाजवी नफा कमावणारी संस्था नाही, त्यामुळे विद्यापिठाने शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विविध संस्था संघटनांंसह विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यापिठाने येत्या मार्च-एप्रिलपासून उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीच्या आणि पुनर्मूल्यांकनाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे परिपत्रक विद्यापिठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार यापुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी २०० रुपये तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या छायांकित प्रतीसाठी १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून पुनर्मूल्यांकनासाठी २५० रुपये आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून २०० रुपये शुल्क आकारले जाईल, असे विद्यापिठाने स्पष्ट केले आहे.

मात्र, व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी वेगळे शुल्क घेणे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. काही वर्षांपूर्वी विद्यापिठाने अकारण नियमात बदल करून पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा असेल तर आधी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेतलीच पाहिजे, असा अतार्किक नियम केला. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच या दोन गोष्टी स्वतंत्र असल्याने दुप्पट वेळही वाया जात आहे.

एवढा भुर्दंड सोसून विद्यार्थ्यांच्या गुणात बदल झाला आणि विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर संबंधित विद्यार्थ्याला त्याने भरलेले शुल्क परत मिळत नाही. एकूणच विद्यापीठ आपली चूक विद्यार्थ्यांच्या शुल्कातून सुधारून घेत आहे. तसेच या कालावधीत विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यापिठाने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

शुल्क परत करा
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना पहिल्यांदा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेतलीच पाहिजे, ही जाचक अट काढून टाकावी. विद्यार्थ्यांकडून छायांकित प्रतीसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी आकारलेले शुल्क परत करावे.
-पुष्कर नाईक, विद्यार्थी

शुल्कवाढ अन्यायकारक
विद्यापिठाने केलेली शुल्कवाढ ही अन्यायकारक आहे. विद्यापिठाने विद्यार्थी हिताचा विचार करून शुल्कात केलेली वाढ मागे घ्यावी.
-अ‍ॅड. यश भुजबळ

Deshdoot
www.deshdoot.com