‘एमपीएससी’कडून २४० पदांसाठी भरती; १५ मार्चला होणार पूर्व परीक्षा
स्थानिक बातम्या

‘एमपीएससी’कडून २४० पदांसाठी भरती; १५ मार्चला होणार पूर्व परीक्षा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२० मध्ये होणार्‍या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता आयोगातर्फे विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहीराती प्रसिद्ध होत आहे. राज्यसेवेनंतर आता वाहन निरीक्षकच्या (एएमव्हीआय) २४० पदांची भरती होणार असून येत्या १५ मार्च २०२० रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. ही परीक्षा मुंबई, नागपूर, औरंगाबाद व पुणे या जिल्हाकेंद्रावर होणार आहे.

गृह खात्याकडून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाकरिता १५ मार्च रोजी परीक्षा होणार आहे. एएमव्हीआय हे पद प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असते. इंजिनिअरिंगची पदवी व पदविका या पदासाठीची शैक्षणिक अर्हता आहे. वाहन निरीक्षकच्या पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययन व बुद्धिमापन चाचणी व यंत्रअभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी, संबंधीत चालू घडामोडी या विषयावर १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ स्वरुपात १०० प्रश्न असतील. मराठी व इंग्रजी या दोन माध्यमात ही परीक्षा होईल.

आयोगाच्या https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. १८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२० या कालावधित या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. नवीन मोटार वाहन कायद्यातंर्गत अनेक पदे रिक्त आहेत. या वर्षी महाभरती होणार असून या त्याद्वारे या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी निवड होणार आहे. १२ जुलै २०२० रोजी मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षा ३०० गुणांसाठी होईल.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
इंजिनिअरिंग पदवी व पॉलिटेक्निक डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वाहन निरीक्षक पदासाठी होत असलेली भरती ही एक सुवर्णसंधी आहे. या संधींचा फायदा करून घ्यावा.
प्रा. राम खैरनार, संचालक, युनिव्हर्सल फाउंडेशन

Deshdoot
www.deshdoot.com