रहाड खोदण्याची सुरु असलेली तयारी
रहाड खोदण्याची सुरु असलेली तयारी
स्थानिक बातम्या

Video : नाशिकच्या रंगपंचमीची ‘रहाड संस्कृती’ : तिवंधा चौक ‘रहाड’

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी

तिवंधा चौकामधील रहाड पेशवेकालीन आहे. बुधा हलवाई दुकानाच्या समोरील चौकात असलेल्या या रहाडीची देखभाल आणि सांभाळ कलाविश्व मंडळ आणि हिंदमाता मंडळ यांच्याद्वारे केली जाते. या रहाडीचा रंग पिवळा असून हा पुर्णपणे नैसर्गिक प्रकारचा फुलांपासून रंग बनवला जातो. रहाडीची उंची रूंदी १२ बाय १२ फूट आहे तर खोली १० फुट आहे. ही रहाड यापेक्षाही खोल होती. परंतु नंतर याची खोली कमी करण्यात आल्याचे कार्यकर्ते सांगतात. इतर रहाडींच्या तुलनेत ही रहाड लहान आहे.

ही रहाड बुजवताना रहाडीत आधीच्या रंगाचे पाणी अर्धी रहाड भरलेली अशा पद्धतीने ठेवून त्यावर उसाचे चिपाड व त्यावर माती या पद्धतीने बुजविण्यात येते. रंगपंचमीच्या दिवशी रंग बनवून झाल्यावर व संपूर्ण रहाड सजवल्यानंतर रंगाची, रहाडीची विधीवत पूजा केली जाते. रहाडीचे मान जळगावकर कुटुंबियांना आहे. त्यांच्या हस्ते ही पूजा होते. तसेच या कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती रहाडीत प्रथम उडी घेते यानंतर इतर मंडळींसाठी ही रहाड खुली केली जाते.

रहाडीची सगळी धुरा येथील स्थानिक मंडळाकडे आहे. चौकातील होळी पेटवणे ती पेटती ठेवणे, रहाड उकरणे तसेच रंग तयार करण्याचे कष्टप्रद सर्व काम येथील कार्यकर्ते करतात. मंडळाचे सुमारे दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते यासाठी सतत कार्यरत असतात. प्रामुख्याने रंगपंचमीच्या दिवशी कोणी बुडू नये यासाठी ताकदवान कार्यकर्ते रहाडीत तसेच वरच्या पायरीवर उभे असतात. कोणी बुडताना दिसताच तात्काळ त्यास वरती खेचले जाते. तर काही शंका वाटल्यास जीवरक्षक काही काळ सर्वांना थांबवून सर्व राहाडीची पाहणी करून पुन्हा रंगोत्सव सुरू होतो.

या रहाडीत अर्धा भाग हा महिलांसाठी राखीव असतो. तर अर्धा भाग पुरूषांसाठी यामुळे पुरूषांप्रमाणेच या रहाडीत महिलाही रंगांचा पुर्ण आनंद लूटातात.

फुलांचा नैसर्गिक रंग
या रहाडचा रंग पिवळा असून यासाठी सर्व प्रकारच्या पिवळ्या फुलांचा वापर केला जातो. यासाठी सुमारे १५० किलो पेक्षा अधिक फुलांची गरज भासते. याची व्यवस्था मार्के तसेच विविध मंदिरातून केली जाते. यामध्ये प्रामुख्याने पिवळा झेंडू, बिजली, हातगा, गिलाडा,चाफा तर सुगंधासाठी मोगर्‍याच्या फुलांचा वापर केला जातो. रंग पक्का बनवण्यासाठी ही फुले कढयांमध्ये उकळवत ठेवली जातात. हे सर्व मिश्रण २० कढई उकळून त्याचा अर्क रहाडमध्ये मिसळला जातो.

वैशिष्ट्ये
* रंंग पिवळा
* रूंदी १२ बाय १२ फुट
* खोली १० फुट
* नैसर्गिक फुलांचा रंग
* लहान आकार
* अर्ध्या भागात महिलांना प्रवेश.

स्त्री पुरूष समानेचा संदेश
शहरातील बहूतांश रहाडमध्ये स्त्रीयांना प्रवेश दिला जात नाही. यासाठी सुरक्षेसह इतर अनेक कारणे माणली जातात. परंतु तिवंधा चौक रहाड येथील रहाडमध्ये अर्धा भाग हा प्रथमपासून महिलांसाठी राखीव असतो. तेथे महिला कार्यकर्ता कार्यरत असतात. यामुळे ही रहाड स्त्री – पुरूष समानतेचा संदेश देणारी असल्याचे मानले जाते.
– सर्वेश देवगिरे, कार्यकर्ता

केवळ रंगोत्सव
कोणताही सन हा कुटुंबियांनी, लोकांनी एकत्र येऊन आनंद लूटावा, विचारांची देवाण घेवाण व्हावी या भावनेतून होत असतात. तशीच भावना नाशिकच्या रहाड परंपरेची आहे. नागरीकांनी एकत्र यावे एकोप्याची भावना वाढावी व रंगोत्सवाचा निव्वळ आनंद उपभोगावा.
– नितीन बागुल, कार्यकर्ता

Deshdoot
www.deshdoot.com