Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : नाशिकच्या रंगपंचमीची ‘रहाड संस्कृती’ : शनिचौक रहाड

Video : नाशिकच्या रंगपंचमीची ‘रहाड संस्कृती’ : शनिचौक रहाड

नाशिक | प्रतिनिधी 

होळीनंतर पाच दिवसांनी येणारा रंगपंचमीचा सण नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नाशिकमध्ये असलेल्या रहाड संस्कृतीमुळे या रंगांच्या सणाची रंगत अधिकच खुलत असते. त्यातच विविध रहाड हे तर नाशिकचे भूषण म्हणून प्रसिद्ध आहेत. तर नुकतीच दंडे हनुमान चौकातील रहाड सापडली असून ती खुली करण्यात आली आहे. यामुळे यंदा ५ राहडीमध्ये नाशिककर रंग खेळताना दिसणार आहेत.

- Advertisement -

संपूर्ण भारतात फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी अर्थात धुलिवंदन या दिवशी रंगोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी फाल्गुन कृष्णपंचमीला अर्थात रंगपंचमीला रंगोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्यातील एक ठिकाण म्हणून नाशिकचा उल्लेख करावा लागेल. हा सण साजरा करण्यात नाशिकचे खास वेगळेपण आहे आणि ते म्हणजे पेशवेकालीन परंपरा लाभलेली रहाड संस्कृती.

विविध नैसर्गिक रंगांनी युक्त असे रंगीत पाणी येथील काही ठरविक चौकात हौदात साठवले जाते. साधारणतः ८ ते ९ फूट खोल या हौदाची विधिवत पूजा केली जाते व त्यानंतर मानाची उडी पार पडते. यानंतर नाशिककर नागरिक या पाण्यात उडी घेऊन रंगपंचमीचा आनंद घेत असतात. होळीनंतर वातावरणात वाढणारा उष्मा सहन करण्याची क्षमता प्राप्त व्हावी व अंगाची होणारी लाहीलाही कमी व्हावी याकरिता शरीराला थंडावा देणारे नैसर्गिक रंग या रहाडीत वापरले जात असतात. याबाबत असादेखील समज आहे की, लहान बाळास या रहाडीत आंघोळ घातल्यास त्याचे उष्णतेच्या व त्वचा विकारांपासून रक्षण होते.

शनिचौक रहाड

काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजाला असणार्‍या शनी चौकातील रहाड पेशवेकाळापासून आहे. २५० ते ३०० वर्षांपुर्वी पेशव्यांचे सरदार रास्ते यांच्या अखत्यारीत ही रहाड होती. त्या काळी ही रहाड म्हणजु कुस्त्या खेळण्याचा हौद होता. या ठिकाणी परिसरातील पहिलवान आपली ताकद जाहिररीत्या अजमावत. रास्ते सरदार याची देखभाल करत असल्याचे सांगितले जाते.

शनी चौकातील शनी चौक मित्रमंडळ आणि सरदार रास्ते आखाडा अतिशय परंपरेने या रहाडीची जपणूक करत आहे. शनि चौकातील एकमेव होळी ही रात्री बारानंतर विधीवत पुजा होऊन पेटवली जाते. तर सकाळपासून रहाड खोदण्यास सुरूवात होते. ही राहड झाकण्यासाठी सागाच्या लाकडाच्या मोठ्या बल्ल्यांचा वापर होतो. यामुळे या रहाडीत पुर्ण माती नसते. केवळ बल्ल्यांपासून वरती माती, मुरूम , खडी डांबर भरलेले असते. यामुळे वरचा भाग उघडून बल्लया काढताच ही रहाड खुली होते.

शनीचौक रहाडीची रूंदी १५ बाय १५ फुट इतकी तर खोली १० फुट (दीड पुरूष) आहे. या रहाडचा रंग हा कायमस्वरूपी गुलाबी ठरलेला आहे. रंगपंचमीच्या दिवशी दीक्षित घराण्याचे मानकरी रहाडची, सात आसरांची विधीवत पुजा करतात. तसेच शनिदेव, हनुमानाची पुजा केली जाते. देवाच्या अंगावर रंग उडवला जातो. यानंतर मानकरी दीक्षित घराण्यातील जेष्ठ व्यक्ती पुर्व बाजूने रहाडमध्ये उडी मारते. यानंतर येथील मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उड्या मारतात.

मंडळाचे १०० ते १५० कार्यकर्ते रहाडसाठी दिवसभर कार्यरत असतात. येथे सुरक्षेची विशेष दक्षता घेतली जाते. रहाडीतील पुर्व कोपर्‍यात रंगामध्ये ६ जीवरक्षक, वरील पायरीवर ६ तर त्यांच्या पाठीमागे दोघेजन असतात. तर दुसर्‍या कोपर्‍यात जेष्ठव्यक्ती लहान मुलांना रंगामध्ये बुचकळून काढतात. कोणी बुडत असेल तर कोणताही कार्यकर्ता डुबकी घेऊन बुडणारांना जीवरक्षकांकडे ढकलतो. जीवरक्षक तात्काळ त्यास उचलून पायरीवरील जीवरक्षकांच्या हवाली करतात. तेथून त्यांना वरखेचून बाहेर काढले जाते. यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात या रहाडीत एकही अपघाताची घटना घडलेली नसल्याचे अवर्जुन सांगितले जाते.

या रहाडीत डुबकी मारून रंगाचा आनंद घेण्यासाठी नाशिकसह इतर शहरातून नागरीक येतात. दिवसभरात सुमारे लाखापेक्षा अधिक लोक या रहाडमध्ये डुबकी मारून जातात असा दावा मंडळाचे अध्यक्ष विकी जोंधळे यांनी केला आहे.

असा तयार होतो रंग
या रहाडचा रंग गलाबी आहे. हा रंग तयार करण्याची पारंपारिक पद्धत आहे. यासाठी सुमारे १४ किला गुलाबी रंग, प्रती किलोसाठी अर्धा किलो सोडा, १ काळा साबण असे मिश्रण मोठ्या कढईमध्ये उकळत ठेवले जाते. सकाळी ९ पासून ते दुपारी ३ पर्यंत केवळ रंग तयार करण्यासाठी वेळ लागतो. एकुण सुमारे २८ कढई रंग उकळून तो रहाडमध्ये भरलेल्या पाण्यात सतत ढवळून एकजीव केला जातो. तर दुपारी ३ नंतर रंग खेळण्यास सुरूवात होते.

वैशिष्ट्ये
* रंंग गुलाबी
* रूंदी १५ बाय १२ फुट
* खोली १० फुट
* नैसर्गिक रंग
* सागवानी बल्लंयांनी झाकली जाते.
* महिलांना प्रवेश नाही.

महिलांसाठी पिचकारी
या रहाडमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नाही. परंतु आतापर्यंत महिलांच्या अंगावर रंग उडवण्यासाठी रहाडमधून बादली भरून काही अंतरावर महिला एकमेकींच्या अंगावर उडवत. आता अटोमॅटीक पिचकारीची व्यवस्था केली आहे. एकाच वेळी अनेक महिलांच्या अंगावर यातून तुषारांप्रमाणे रंग उडवला जाणार आहे. अशी नव्याने व्यवस्था करण्यात आली आहे. जेणे महिलांना सहभागाचा आनंद मिळेल
– राहुल गुप्ता, कार्यकर्ता

शेकडो वर्षाची परंपरा कायम
शनिचौक परिसरातील रहाडी पेशवे कालीन असून त्यास २५० ते ३०० वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा या चौकातील सर्व कुटुंबियांनी जपली आहे. या रहाडमध्ये डुबकी घेतलेल्या मुले तसेच व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे त्वचा रोग होत नाहीत. तसेच उन्हाळा बाधत नाही. यामुळे मानाच्या पुजेनंतर अबाल वृद्ध या रहाडीत भक्ती भावाने डुबकी मारून आनंदासह लूटतात.
– अविनाश दीक्षित, मानकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या