अखेर ‘राज्यराणी’ १० जानेवारीपासून नांदेडहून सुटणार
स्थानिक बातम्या

अखेर ‘राज्यराणी’ १० जानेवारीपासून नांदेडहून सुटणार

Abhay Puntambekar

नाशिकरोड। प्रतिनिधी
अखेर राज्यराणी एक्सप्रेस १० जानेवारीपासून नांदेडहून सुटणार आहे. म्हणजेच ही गाडी मनमाड-मुंबई ऐवजी नांदेड-मनमाड-मुंबई  धावणार आहे. त्यामुळे नाशिककरांना आपल्या हक्काच्या गाडीत जागेसाठी झगडावे लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ खा. हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकात सर्व पक्षीय आंदोलन झाले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

मुंबईत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटून ही गाडी नांदेडला न नेण्याची मागणी अनेकदा भेटून करण्यात आली होती. मात्र, रेल्वेने नाशिककरांवर अन्याय करत ही गाडी नांदेडपर्यंत नेली आहे. मुंबईला जाणार्‍या पंचवटीवरील ताण कमी करावा यासाठी राज्यराणी एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती.

पंचवटी एक्सप्रेसप्रमाणेच ती मनमाडहून सकाळी सुटते. मनमाड-राज्यराणी एक्सप्रेस १० जानेवारीपासून मनमाड-मुंबई एवजी नांदेड-मुंबई अशी सोडण्याबाबतचे पत्र रेल्वे बोर्डाचे कोंचिंग विभागाचे उपसंचालक विवेक कुमार सिन्हा यांनी संबंधित रेल्वे अधिकार्‍यांना पाठवले आहे.

दि.१० जानेवारीपासून राज्यराणी नांदेडहून मुंबईकडे २२ वाजता सुटेल. तर मुंबईहून नांदेडकडे ७.२० वाजता निघेल. नेहमीच्या रेल्वे स्थानकांशिवाय या गाडीला अनकई, औरंगाबाद, परभणी, पूर्णा येथे वाढीव थांबे असतील. या गाडीला सतरा बोगी असतील.

Deshdoot
www.deshdoot.com