आकाशवाणी नाशिक केंद्राच्या वतीने ‘रेडिओ किसान दिन’ उत्साहात साजरा
स्थानिक बातम्या

आकाशवाणी नाशिक केंद्राच्या वतीने ‘रेडिओ किसान दिन’ उत्साहात साजरा

Abhay Puntambekar

शेतकरी मेळाव्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

नाशिक । प्रतिनिधी

आकाशवाणी नाशिक केंद्र आणि उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय , मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५ फेब्रुवारी  हा दिवस रेडिओ किसान दिन म्हणून साजरा करण्यात आला. मालेगाव तालुक्यातील सातमाने येथे यानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

रेडिओ किसान दिनाच्या पार्श्वभूमीवर विनोद जाधव यांच्या शेतात शेतकरी मेळावा पार पडला. उपविभागीय कृषी अधिकारी दिलिप देवरे, लखमापूर येथील डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. सचिन हिरे, जिल्हा कृषी तंत्र अधिकारी संजय शेवाळे, मालेगावचे तालुका कृषी अधिकारी अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी मेशी, सातमाणे व मालेगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

रेडिओ आणि शेतकरी यांचे नटे अतूट राहिले असून शेती व्यवसायासंदर्भातील बारीक सारीक गोष्टींचे ज्ञान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आज देखील रेडिओ जवळचा वाटतो. दररोज सायंकाळी ७. ३० वाजता आकाशवाणीच्या प्रादेशिक केंद्रावरून संपूर्ण देशात एकाचवेळी प्रसारित केला जाणारा किसनवाणी हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हंणून ठरला आहे.

बदलत्या काळात आकाशवाणीने कात टाकली असून एआयआर न्यूज सारख्या अँपच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांशी असणारा संवाद थांबला नसल्याची माहिती नाशिक आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी तथा किसनवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते नानासाहेब पाटील यांनी दिली. उपविभागीय अधिकारी देवरे यांनी शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली.

नैसर्गिक, मानवी संकटांपासून शेतीपिकांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात आजदेखील रेडिओ शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे ते म्हणाले. शेवगा, डाळिंब लागवड, रोपवाटिका, ठिबक व तुषार सिंचन पद्धती, शेतीशाळा याबाबतच्या शासन योजनांबद्दल शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.

डाळिंब पीक व्यवस्थापन या विषयावर डॉ. हिरे यांनी संवाद साधला. लागवड तंत्र, कीड व रोगांपासून पिकाचे संरक्षण या बाबत माहिती देतानाच डाळिंब रोपवाटिकेची निर्मिती हा पूरक व्यवसाय कसा होऊ शकतो याबद्दल त्यांनी सोदाहरण माहिती दिली. उत्पादन वाढीसाठी मधमाशी पालन हाच एकमेव पर्याय असून गटशेतीचा अंगीकार करून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यामिनी भाकरे, शिल्पा फासे यांनी केले तर विनोद जाधव यांनी आभार मानले.

Deshdoot
www.deshdoot.com