पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर
स्थानिक बातम्या

पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील पंधरा पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण सोडत शनिवारी (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अपर जिल्हाधिकारी नीलेश सगर यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.

येवला व बागलाण पंचायत समिती सभापतीपद हे अनुसूचित जमाती (एसटी) महिलेसाठी आरक्षीत झाले आहे. मात्र, या प्रवर्गातून एकही महिला सदस्य निवडून आलेली नाही. त्यामुळे सभापती निवडीनंतर या ठिकाणचे आरक्षण पुन्हा नव्याने काढण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक झाली. १४ मार्च २०१७ रोजी पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड झाली होती, तर २१ मार्च २०१७ रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. सभापती व पदाधिकार्‍यांची असलेली अडीच वषार्र्ंची मुदत १४ व २१ सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात आली.

परंतु शासनाने जिल्हा परिषद पदाधिकारी व पंचायत समिती सभापतींना चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० ऑगस्ट रोजी हा आदेश ग्रामविकास विभागाने काढला होता. चार महिन्यांची दिलेली मुदत २० डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन २० डिसेंबरनंतर कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या होत्या. या आदेशानुसार शनिवारी (दि.२१) जिल्हा प्रशासनाकडून पंचायत समितींच्या सभापतींचे सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आली.

सर्वसाधारणसाठी आरक्षण नाही
सोडतीमध्ये सर्वसाधारण व अनुसूचित जाती महिला या दोन प्रवर्गासाठी जागाच नसल्यामुळे आरक्षण काढण्यात आले नाही. अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीसाठी (३), अनुसूचित जमाती (महिला) ४ याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले. अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित पंचायत समित्यांकरिता अनुसूचित जाती (१), अनुसूचित जाती महिला (0), अनुसूचित जमाती (१). अनुसूचित जमाती महिला (१) नागरिकांचा मागास प्रवर्ग (२), नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, (२ ) सर्वसाधारण (0), सर्वसाधारण महिला (१)याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले.

तीन जानेवारीला निवडणूक
शनिवारी (दि.२१) आरक्षण काढल्यानंतर सायंकाळी, पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम घोषीत करण्यात आला. पंचायत समिती सभापती निवड प्रक्रीया ३ जानेवारीला सकाळी ११ वाजता त्या-त्या पंचायत समित्यांमध्ये होणार आहे. यासाठी अजेंडा काढण्याचे आदेश प्रशासनाने पंचायत समिती प्रशासनाला दिले आहेत.
..
असे आहे आरक्षण
सर्वसाधारण (महिला ) ः निफाड
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) ः मालेगाव, नांदगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला) ः सिन्नर, नाशिक
अनुसूचित जमाती (एसटी महिला) ः दिंडोरी, कळवण, बागलाण, सुरगाणा, येवला
अनुसूचित जमाती (एसटी) ः इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, देवळा
अनुसूचित जाती (एससी) ः चांदवड

Deshdoot
www.deshdoot.com