‘करोना’ परिस्थितीवर नऊ सदस्यीय समितीचा ‘वॉच’
स्थानिक बातम्या

‘करोना’ परिस्थितीवर नऊ सदस्यीय समितीचा ‘वॉच’

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

करोना व्हायरसचा शहरात फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात साथरोग कायदा १९८७ लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व यंत्रणेत समन्वय राहावा यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापना केली असून निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. करोना परिस्थितीवर ही समिती वॉच ठेवेल.

करोना व्हायरसचा संसर्ग दुसर्‍या टप्प्यात असून त्याचा फैलवा होण्याचा धोका पहिल्यापेक्षा वाढला आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे गरचेचे आहे. अपरिचित व्यक्ती विशेषत: अशी व्यक्ती करोनाबाधित क्षेत्रातून आलेली असल्यास अन्य व्यक्तीशी स्वत:हून संपर्क टाळणे अनिवार्य झाले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यालगत असलेल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत करोना विषाणूग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत व त्या जिल्ह्यांमधून नाशिक जिल्ह्यामध्ये नियमित वाहतूक सुरू असल्याने या आजाराचा संसर्ग नाशिक जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने स्थानिक सक्षम अधिकार्‍यांकडून क्षेत्रीय स्तरावरून कार्यवाही करून घेणे, आदेशांची अंमलबजावणी करणे, दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात एकत्रित करणे, सर्व यंत्रणेत समन्वयक स्थापन करणे, नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आदेशातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी नाशिक करोना विषाणू (कोव्हीड १९) समन्वयक समितीची स्थापन केली आहे.

समिती खालीलप्रमाणे
यात निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (समन्वयक ), अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ग्रामीण पोलीस नाशिक, पोलीस उपायुक्त (शहर), उपायुक्त, महानगरपालिका, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद नाशिक), प्रादेशिक परिहवन अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका)

हॉटेल, लॉन्समध्ये लग्नकार्यास बंदी
करोना व्हायरसचा धोका वाढत असून जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने खबरदारी म्हणून कोणत्याही ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी करू नये, असे आदेश जारी केले आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी हॉटेल, मंगल कार्यालये, मॅरेज हॉल येथे लग्न व इतर सामूहिक कार्य ३१ मार्चपर्यंत आयोजित करण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील.

Deshdoot
www.deshdoot.com