पंचायत राज पुरस्कार स्पर्धा : नाशिक जिल्हा परिषदेचा मुंबईत गौरव
स्थानिक बातम्या

पंचायत राज पुरस्कार स्पर्धा : नाशिक जिल्हा परिषदेचा मुंबईत गौरव

Abhay Puntambekar

पंचायत राज पुरस्कार स्पर्धा; कळवण, इगतपुरी पंचायत समितीचाही सन्मान

नाशिक । प्रतिनिधी

ग्रामविकास विभागाने २०१८-१९ मध्ये घेतलेल्या पंचायत राज पुरस्कार स्पर्धेत नाशिक जिल्हा परिषदेला गुरुवारी (दि.१२) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. याबरोबरच कळवण व इगतपुरी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या दोन सेवकांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.

पंचायत राज संस्थांना त्यांनी केलेल्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता अधिक वाढविणे व त्यांच्यामध्ये उत्कृष्ट कामाची स्पर्धा निर्माण करण्यासाठी सदरचे पुरस्कार देण्यात येतात. पंचायत राज संस्थांचे कामकाज, संस्थेची रचना, कार्यपद्धती, क्षमतावृद्धी, सेवक व्यवस्थापन आदी मुद्यांवर जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांचे मूल्यांकन करण्यात करून हे पुरस्कार देण्यात येतात.

जिल्हा परिषदेला प्राप्त होणार्‍या तक्रारी, निवेदने, बैठकांचे इतिवृत्त, शासन दरबारी केला जाणारा पत्रव्यवहार, सेवकांच्या सेवा, पुस्तकांची नोंद, फायलींचा निपटारा, योजनांची अंमलबजावणी आदी प्रशासकीय कामकाजाची पंचायत राज व्यवस्थेत पाहणी केली जाते विभाग आणि राज्य अशा दोन स्तरांवर हे पुरस्कार देण्यात येतात.

शासनाने २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या दप्तराची तपासणी केली होती. यामध्ये नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला. विभाग स्तरावर नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समितीला द्वितीय तर इगतपुरी पंचायत समितीला तृतीय क्रमांक मिळाला.

केदारे, सनेर यांना गुणवंत पुरस्कार
नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषदेचे कनिष्ठ सहाय्यक मंगेश केदारे व निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक शीतल सनेर यांनाही गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, समाजकल्याण सभापती सुशीला मेंगाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव, महेश पाटील, सहायक प्रशासन अधिकारी महेंद्र पवार, रणजित पगारे, रवींद्र आंधळे, गोविंद पाटील, प्रमोद ढोले यांच्यासह कळवण व इगतपुरी पंचायत समितीचे सभापती उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com