Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवैतरणाचे एक टीएमसी पाणी नाशिकला मिळणार

वैतरणाचे एक टीएमसी पाणी नाशिकला मिळणार

नाशिक । प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातली अपर वैतरणा धरणातील एक टीमएसी पाणी हे गोदावरी खोर्‍यात वळविण्यात येणार आहे. मुकणे धरणातून पाईपलाईनद्वारे हे पाणी गंगापूर धरणात वळविण्यात येईल. हे पाणी बिगर सिंचनासाठीच वापरण्यात येणार असल्याने नाशिक शहराची तहान भागविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. परिणामी गंगापूरचे पाणी इतर पाणी वापर संस्थांना देता येईल. या कामाचा सर्वेक्षण होत असून जिल्हा प्रशासनाने त्यास पोलीस संरक्षण उपलब्ध करुन दिले आहे.

- Advertisement -

मुकणे धरणाची उंची वाढविण्यात आली असून पाणी साठवण क्षमता साडेसात टीमएसी इतकी झाली आहे. परंतु या ठिकाणी पावसाचे प्रमाण लक्षात घेता हे धरण १०० टक्के भरणे शक्य नाही. ते बघता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे वैतरणाचे पाणी तुटीच्या गोदावरी खोर्‍यातील मुकणे धरणात वळविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठवाड्यासह नाशिकलाही मुबलक पाणी या धरणांतून उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

वैतरणातील पाणी मुकणेत वळविण्यासाठी सर्वेक्षण करणे अत्यावश्यक आहे. पण स्थानिकांचा विरोध पाहाता तेथे कायदा सुव्यवस्थेची समस्या उपस्थित होऊ शकते. त्यामुळे सर्वेक्षणाच्या कामासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध व्हावा अशी मागणी पाटबंधारे विभागाने नाशिक जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने लागलीच ग्रामीण पोलीसांकडे पत्र लिहीत बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नाशिकला मिळणार लाभ
शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात नाशिकची तहान भागविण्यासांठी मुकणे पाईपलाईन योजना राबविण्यात आली आहे. त्यामुळे गंगापूर धरणावरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होईल. वैतरणाचे १ हजार दलघफू मुकणेत उपलब्ध झाल्यास गंगापूरवरील मनापचे अवलंबित्व कमी होत हे पाणी गोदावरी कालव्यांना मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या