उपेक्षितांच्या मदतीसाठी आज ‘नाशिक रन’

उपेक्षितांच्या मदतीसाठी आज ‘नाशिक रन’

सातपूर । प्रतिनिधी

सामाजिक जाणिवेतून उपेक्षितांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने २००३ पासून सुरू असलेल्या नाशिक रन या ‘रन फॉर हेल्प’ची दौड आज शनिवारी महात्मानगर मैदानावर घेण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून पहाटे ६.३० ते ७.३० दरम्यान ही रेस घेतली जाणार आहे. त्यानंतर नाशिक रनचे आयोजन होणार आहे.

‘नाशिक रन’ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सलग १८ व्या दौडसाठी उद्योजक व नागरिक सज्ज झाल्याचे चित्र आहे. यंदाच्या दौडमध्ये सुमारे १५ ते २० हजार नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा आहे. ३ व ५ कि.मी.साठी ही दौड घेण्यात येत असून या माध्यमातून नागरिकांचा सहभाग सामाजिक उपक्रमात घेतला जात असल्याने नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेताना दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर नाशिक रनची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून बॉश व टीडीके इप्कॉस तसेच सहभागी उद्योगांच्या चारशेहून अधिक स्वयंसेवकांना महात्मानगर क्रीडांगणावर प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण बॉश लि.चे सुरक्षा व्यवस्थापक व नाशिक रनच्या ऑपरेशन टीमचे प्रमुख विजय काकड व त्यांच्या सहकार्‍यांनी दिले.

नाशिक रनमध्ये विविध कार्यप्रणाली पार पडत असून या कार्यप्रणालीचे काम प्रभावीपणे व्हावे म्हणून त्यांची योग्य रचना विविध संघांच्या माध्यमातून केली आहे. रचना प्रभावीपणे पार पडावी म्हणून विविध उपसमित्यांच्या माध्यमातून जबाबदार संघांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने क्विक रिस्पॉन्स टीम, सुरक्षारक्षक टीम, स्वागत टीम, फ्लॅग ऑफ व्यवस्थापन टीम, हायड्रेशन पॉईंटीर्मंट टीम, मेडिकल सपोर्ट टीम, स्टेज व्यवस्थापन टीम, १० किलोमीटर रन रूट टीम, ५ किलोमीटर रन रूट टीम, चिअरिंग पॉईंट टीम, मेडल वाटप टीम, नाश्ता वाटप टीम यांची निर्मिती करण्यात आली आहे.

या रचनांचा व कामाचा आढावा नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष रमेश जी. आर., सचिव अनिल दैठणकार, खजिनदार राजाराम कासार, विश्वस्त मुकुंद भट, प्रबल रे, अशोक पाटील, अनंत रामन, श्रीकांत चव्हाण आदी कामाच्या नियोजनाचा आढावा घेऊन रनमधील कार्यरत असलेल्या विविध संघांना मार्गदर्शन केले. तसेच रनच्या कार्यालयीन कामाच्या पूर्ततेसाठी नितीन देशमुख, स्नेहा ओक व उमेश ताजनपुरे कार्यरत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com